शिक्षकाविनाच निघाली विद्यार्थ्यांची सहल
By Admin | Updated: February 11, 2015 01:49 IST2015-02-11T01:49:13+5:302015-02-11T01:49:13+5:30
काकडधरा जि.प. प्राथमिक शाळेची इयत्ता पहिली ते चौथीच्या सुमारे २५ विद्यार्थ्यांची रविवारी सहल आयोजित करण्यात आली़ यात एका आॅटोमध्ये

शिक्षकाविनाच निघाली विद्यार्थ्यांची सहल
तळेगाव (श्या़पं़) : काकडधरा जि.प. प्राथमिक शाळेची इयत्ता पहिली ते चौथीच्या सुमारे २५ विद्यार्थ्यांची रविवारी सहल आयोजित करण्यात आली़ यात एका आॅटोमध्ये (मॅजिकव्हॅन) विद्यार्थ्यांना बसविण्यात येऊन त्यांना रवाना केले गेले़ स्वत: शिक्षक मात्र अन्य शिक्षकांच्या कारद्वारे सहलस्थळी पोहोचले़ शिक्षकांच्या सहलीचा हा प्रकार पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या़
काकडधरा येथील जि़प़ शाळेच्या शिक्षकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने सहलीचे आयोजन केले़ रविवार शाळेच्या सहलीचे आयोजन करण्यात आले. तळेगाव ते सिंभोरा-मोर्शी मार्गे पिंगळादेवी तेथून मोझरीला परत, असा १४० किमीचा प्रवास या विद्यार्थ्यांना शिक्षकाविना करावा लागला़ गाडीची आसन क्षमता आठ ते नऊ प्रवासी असताना यात चक्क २२ ते २५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० रुपये घेऊन कोंबण्यात आले. स्वत: शिक्षकांनी मात्र आरामात दुसऱ्या वाहनात बसून सहलीचा आनंद लुटला़ नियमाप्रमाणे शासकीय वाहनातूनच सहल घेऊन जावे लागते़
शिवाय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे़ तशा सूचनाही शिक्षण विभागाने यापूर्वी दिलेल्या आहेत़ असे असताना सर्व नियम डावलून अशा सहलीचे आयोजन करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पालकांद्वारे उपस्थित केला जात आहे़ मार्गातच एखादे संकट उभे ठाकल्यास जबाबदार कोण, चिमुकल्यांनी काय करावे, आदी प्रश्नही उपस्थित केले जात आहे़
याबाबत विभागातील वरिष्ठांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे़ याबाबत गट शिक्षण अधिकारी आऱ एच़ खान यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़(वार्ताहर)