पढेगावसह चिकणीला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:35 IST2019-06-05T22:34:47+5:302019-06-05T22:35:05+5:30
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळाने चिकणी व परिसरातील गावांना तडाखा दिला. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.

पढेगावसह चिकणीला वादळाचा तडाखा
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळाने चिकणी व परिसरातील गावांना तडाखा दिला. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.
पढेगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर बापूराव कोहाड, शेत स.नं. १७८, मौजा पढेगाव यांच्या शेतातील बंड्यावर वीज पडल्यामुळे बंडा पूर्णत: जळून खाक झाला. यामध्ये त्यांचे एक लाख रुपयांवर नुकसान झाले. थोडक्यात मात्र बैलजोडी बचावली. बंड्यामध्ये भरून असलेले २० हजार रुपयांचे चण्याचे कुटार, २० स्प्रिंकलर पाईप, लागवडीकरिता आणलेले १० क्विंटल हळदीचे बेणे, ताटवे, सागवान फाटे, टिनपत्रे तसेच इतर शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामुळे कोहाड यांना मोठा आर्थिक फटका बसला. नुकसानाचे सर्वेक्षण करून त्यांनी भरपाईची मागणी केली आहे.
पढेगाव येथील अनेक घरंवरील टिनपत्रे उडाली. एक टिनपत्रा तर चक्क सिंंगल फेज डी.पी वर आदळला आणि त्यावरच लोंबकळत राहिला. तर चिकणी, पढेगाव येथे वाºयाच्या झोतामुळे विद्युत तारा तुटल्यात तसेच देवळी येथून चिकणी, जामणी, पढेगाव, निमगाव, दहेगाव, केळापूर आदी गावांना विद्युत पुरवठा करणारे विद्युत खांबच तुटल्याने सहाही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे ग्रामस्थांना रात्र काळोखातच काढावी लागली.
चिकणी येथील तलाठी सायरे यांनी बुधवारी सकाळी नुकसानाची पाहणी करीत नोंद घेतली. वरिष्ठांकडे तातडीने अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती सायरे यांनी लोकमतला दिली.
चिकणी येथील वासुदेव कोहळे, गजानन डायरे, अयुब शेख, प्रशांत देशमुख, अशोक ठाकरे व इतरही बºयाच लोकांच्या घरावरील टिनपत्रे उडाले.