संसर्ग वाढतोय तरीही खबरदारीचे कठोर निर्बंध केवळ कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 05:00 IST2021-03-18T05:00:00+5:302021-03-18T05:00:11+5:30
मागील काही दिवसापासून जिल्ह्यात दररोज दीड शतकाहून अधिक नवीन कोविडबाधित सापडत आहेत. जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढविण्यात आल्याने नवीन कोविडबाधित वेळीच ट्रेस होत असले तरी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला वेळीच ब्रेक लावण्यासाठी पुढील १५ दिवसाकरिता जिल्ह्यातही काही कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण याच निर्बंधांदरम्यान गर्दीच्या ठिकाणी अनेक व्यक्ती विना मास्क वावरण्यातच धन्यता मानत आहेत.

संसर्ग वाढतोय तरीही खबरदारीचे कठोर निर्बंध केवळ कागदावरच
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यासह जिल्ह्यात सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाकडून पुढील १५ दिवसाकरिता काही कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु, हे निर्बंध सध्या कागदावरच असल्याचे चित्र लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये बघावयास मिळाले.
मागील काही दिवसापासून जिल्ह्यात दररोज दीड शतकाहून अधिक नवीन कोविडबाधित सापडत आहेत. जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढविण्यात आल्याने नवीन कोविडबाधित वेळीच ट्रेस होत असले तरी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला वेळीच ब्रेक लावण्यासाठी पुढील १५ दिवसाकरिता जिल्ह्यातही काही कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण याच निर्बंधांदरम्यान गर्दीच्या ठिकाणी अनेक व्यक्ती विना मास्क वावरण्यातच धन्यता मानत आहेत. इतकेच नव्हे तर कोरोना संकटाच्या काळात उपयुक्त ठरणाऱ्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला सर्रास फाटा दिला जात असल्याचे बघावयास मिळाले. तर काही व्यक्ती जिल्हा प्रशासनासह शासनाच्या सूचनांचे पालन करीत आहेत. पण याच गाफिल व्यक्तींमुळे जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे.
चित्रपटगृह बंदच
कोरोनाची एन्ट्री होताच देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील चित्रपटगृहही बंद राहिले. तर शिथिलता मिळाल्यावर तब्बल अकरा महिन्यानंतर ११ मार्चपासून वर्धा शहरातील काही चित्रपटगृह अर्ध्या क्षमतेने सुरू झाले आहेत. या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचे शरीराचे तापमान मोजल्यावरच तसेच मास्क परिधान केलेल्या व्यक्तीलाच एन्ट्री दिली जात आहे. शिवाय चित्रपटगृहाचा परिसर वेळोवेळी निर्जंतूक केला जात आहे.
विवाह समारंभ
विवाह सोहळ्यांसाठी पोलीस प्रशासनाकडून ५० व्यक्तींची परवानगी दिली जात आहे. तर विवाह साेहळ्यात सहभागी हाेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आरटीपीसीआर पद्धतीने कोविड टेस्ट करणे बंधनकारक आहे. पण अनेक गाफिल व्यक्ती परवानगी न घेता फार्म हाॅऊस तर काही घराच्या आवारात शामियाना टाकून विवाह सोहळे आटोपत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी काही व्यक्ती जिल्हा प्रशासनाचे नियम पाळतात तर काही नियमांना बगल देण्यातच धन्यता मानतात.
गृहविलगीकरण
नवीन नियमांनुसार प्रत्येक कोविडबाधित व्यक्तीच्या घरावर विशिष्ट फलक लावणे क्रमप्राप्त आहे. वर्धा शहरात कोविड बाधित व्यक्तीच्या घरावर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वर्धा नगरपालिका प्रशासनाकडून फलकही लावले जात आहेत. पण आर्वी येथील कन्नमवारनगर भागातील एका कोविडबाधिताच्या घराची पाहणी केली असता त्याच्या घरावर कुठलाही फलक नसल्याचे लोकमतच्या प्रतिनिधीला बघावयास मिळाले.
शासकीय कार्यालय
जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील ३०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता त्यांच्या मूळ गावावरून अप-डाऊन करतात. अशातच वर्धा जिल्ह्यात सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढल्याने काही अधिकारी भीतीपोटीच कार्यालयात जाण्याचे टाळत आहेत. तर काही अधिकारी अजूनही अप-डाऊन करीत आहेत. आर्वी येथील कृषी कार्यालयात पाहणी केली असता सातपैकी दोघे सुटीवर असल्याचे सांगण्यात आले.
अंत्यविधी कार्यक्रम
कोविडबाधित मृत व्यक्तीवर वर्धा शहरातील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यासाठी विशिष्ट जागा निश्चित केली आहे. कोविड बाधित मृत व्यक्तीची अंत्ययात्रा न काढता त्या व्यक्तीवर या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत. तर काही अंतरावर असलेल्या स्मशानशेडमध्ये कोविड बाधित वगळता इतर मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात. असे असले तरी नवीन निर्बंधामुळे केवळ २० व्यक्तींनाच अंत्ययात्रेत सहभागी होता येते. पण काही ठिकाणी या नियमाला बगल मिळत आहे.
१२४ व्यक्तींवर झाली कारवाई
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी १६ मार्चला एक आदेश निर्गमित केला आहे. हा आदेश निर्गमित होताच जिल्हा प्रशासनाच्या नियमांना बगल दिल्याचा ठपका ठेवून १२४ व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. यात घराबाहेर पडल्यावर मास्कचा वापर न करणारे सर्वाधिक असून आर्वी येथील एका हॉटेल व्यावसायिकाचा समावेश आहे. या हॉटेल व्यावसायिकाने रात्री उशिरापर्यंत त्याचे व्यावसायिक प्रतिष्ठान सुरू ठेवले होते. त्यामुळे त्याला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.