वादळी पावसाचा पिकांना तडाखा
By Admin | Updated: February 12, 2015 01:30 IST2015-02-12T01:30:50+5:302015-02-12T01:30:50+5:30
गत दोन वर्षापासून रबी पिके ऐन बहरावर आली असताना निसर्गाचा कहर व त्यामुळे प्रचंड नुकसान हे समीकरणच जिल्ह्यात रूढ झाले आहे. गत वर्षी गव्हाची वाट लागली.

वादळी पावसाचा पिकांना तडाखा
वर्धा : गत दोन वर्षापासून रबी पिके ऐन बहरावर आली असताना निसर्गाचा कहर व त्यामुळे प्रचंड नुकसान हे समीकरणच जिल्ह्यात रूढ झाले आहे. गत वर्षी गव्हाची वाट लागली. यंदा असे होणार नाही अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु जिल्ह्याला मंगळवारी मध्यरात्री वादळ वाऱ्यासह पावसाने पुरते झोडपून काढले. यात आठही तालुक्यातील गहू, चणा, तूर या उत्पादनावर आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. यात समुद्रपूर तालुक्यात एक बैल मरण पावला.याव्यतिरिक्त कुठलीही जीवितहानी झाल्याची नोंद नसली तरी पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. ओंब्यावर आलेला गहू पुरता खाली झोपला. हरभरा पिकाचा फुलोरा गळाला. उरलासुरला कापूसही जमीनदोस्त झाला. यंदा आंब्याला चांगला बहर आला आहे. पण रात्रीच्या पावसाने हा बार रातोरात गळाला. तसेच फळावर आलेला संत्राही गळाला. इतर लिंबूवर्गीय पिकांचेही बरेच नुकसान झाले. कारंजा तालुक्यात काही ठिकाणी गारा पडल्याची माहिती आहे. वर्धा तालुक्यात वायगाव(नि.), तळेगाव(टा.), शिरसगाव, गोजी, यासह पवनार, सेवाग्राम आदी शिवारातील पिकांचे मोठे नुकसान झाले. वायगाव(नि) शिवारातील आशिष जिंदे, अशोक देशमुख, प्रशांत वाटगुळे, राजू भोमले, सतीश गोल्हर, पुंडलिक चावरे, पुरूषोत्तम वेले, प्रशांत आदींचे नुकसान झाले. आधीच सोयाबीन व कापसाला अत्यल्प भाव देऊन शेतकरी वर्गाची पिळवणूक केली जात आहे. त्यातच रबी पिकांचे नुकसान झाल्याने आता कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने नुकसानीचा सर्व्हे करून मदत द्यावी अशी मागणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
कारंजात गारपिटीचा कहर
कारंजा(घा.) - मध्यरात्रीच्या सुमारास विजेचा कडकडाट, वादळी वारा व पावसासह काही ठिकाणी गारपिटीने कहर केला. तालुक्यातील हेटीकुंडी, मोर्शी, खरसरवाडा, ठाणेगाव, जामनी आदी गावातील गहू, हरभरा, तूर आदी पिके ऐन कापणीवर असताना मातीमोल झाली. भाजीपाला पिकांसह संत्रा, लिंबु फळपिकालाही याचा फटका बसला आहे. काल दिवसभर आकाश निरभ्र होते. परंतु मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस आणि गारांचा वर्षाव झाल्याने पिके जमीनदोस्त झाली. गव्हाची पत जाण्याचाही धोका निर्माण आहे.
वादळी पावसामुळे गहू लोटला
हिंगणघाट- तालुक्यात पहाटे विजेच्या गडगडाटासह वादळी पावसामुळे जवळपास ३० ते ४० टक्के गहु लोटला. जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून लावलेल्या ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी सकाळी १०.२ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. तालुक्यात गव्हाचा २ हजार हेक्टरचा पेरा असून यापैकी ओंबीवर आलेला ३० ते ४० टक्के गहू जमिनीवर लोटला. त्यामुळे. त्यामुळे नुकसान होणार होणार असल्याची माहिती आहे.
कोरडवाहू चण्याचेही नुकसान
सिंचनाची सोय नसलेले अनेक शेतकरी लवकर हरभरा पेरत असतात याला कोरडवाहू हरभरा म्हटले जाते. हा चना कापणीवर आला आहे. सेलू परिसरात अनेक शेतात या चन्याची कापणी करून त्याचे गठ्ठे जमा करून ठेवले होते. परंतु हा चणाही ओला झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सेलू परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहे.
आंब्याचा बहर गळाला
यंदा आंब्याला भरपूर प्रमाणात बहर आला आहे. परंतु रात्री अवकाळी झालेल्या पावसाने आंब्याचा बहर मोठ्या प्रमाणात गळाला. त्यामुळे गावरानी आंब्याचा स्वाद चाखायला मिळेल का असा प्रश्न उपस्थित हित आहे. त्याच प्रकारे कारंजा(घा.) तालुक्यात गारांमुळे व जोरदार पावसाने संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले.
आर्वीत गहू, हरभरा पिकांचे नुकसान
आर्वी- मंगळवारी मध्यरात्री झालेल्या पावसाचा आर्वीसह तालुक्यातील वाढोना, वागदा, नांदपूर, अहिरवाडा, सर्कसपूर, नेरी, खुबगाव, दहेगाव(मु.), निंबोली(शेंडे), वर्धमनेरी, जळगाव, टाकरखेडा, वाढोणा, पिंपळखुटा, गुमगाव, राजापूर, वाढोडा(पुनर्वसन), सावळापूर, वडगाव, रोहणा, साळधारा, चिंचोली(डांगे), पाचोड, हऱ्हाशी, एकलारा, धनोडी, बाजरवाडा, हरदोळी, पानवाडी आदी गावांना तडाखा बसला.गहू चना पिकांचे नुकसान झाले. आर्वीतील जिनिंग-प्रेसिंगमध्ये असलेल्या कापसाची गंज्या या अवकाळी पावसाने ओल्या झाल्या.