नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करा
By Admin | Updated: March 30, 2017 00:49 IST2017-03-30T00:49:05+5:302017-03-30T00:49:05+5:30
गोदामाची उपलब्धता, मापाई व तोलाईसाठी आवश्यक मनुष्यबळ असल्याने रोहणा येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आहे.

नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करा
जनमंचची मागणी : संपूर्ण तूर खरेदी करावी
रोहणा : गोदामाची उपलब्धता, मापाई व तोलाईसाठी आवश्यक मनुष्यबळ असल्याने रोहणा येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आहे. येथील तूर खरेदी केंद्र सुरू केल्यास आर्वी केंद्रातील भार कमी होईल. तसेच शेतकऱ्यांकडील संपूर्ण तूर शासनाने खरेदी करून तूर उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी जनमंचने केली आहे.
मागील वर्षी तुरीची डाळ २०० रूपये प्रतिकिलो होती. डाळीच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या तुरीला चांगला भाव मिळाला. शेतकऱ्यांना तुरीसाठी मिळालेले चांगले दर पाहता पेरा वाढविला. तूर डाळीचा साठेबाजीचा प्रकार पुढे आल्याने सर्वत्र धाडसत्रांचा अवलंब करण्यात आला. त्यातच महाराष्ट्र शासनाने तुरीचा दर नियंत्रण कायदा करण्यासाठी प्रारूप केंद्र सरकारला पाठविले. मात्र केंद्राने सदर प्रारूप फेरविचारासाठी राज्य शासनाकडे पाठविले. शेतमालावर आधारित असलेल्या पक्क्या उत्पादनांची भाववाढ कायम असताना शासनाने त्याकडे डोळेझाक केली आहे. मुंगाची डाळ ६५ रूपये किलो असताना त्याच डाळीपासून निर्मित पदार्थ २८० रूपये किलो दराने विकले जात आहे. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या मालाची भाववाढ झाल्यावर ओरड होते. मात्र शेतकऱ्यांना एरवी कमीभाव मिळतो याकडे कुणाचेच लक्ष जात नाही. मागच्या वर्षी तुरीला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीचा पेरा वाढविला. सुदैवाने यंदा पिकही समाधानकारक आले. तुरीचे उत्पादन १६ दशलक्ष टनावरून २२ दशलक्ष टनावर गेले. बाजारातील तुरीचे भाव कोसळले. शेतकऱ्यांजवळ मोठ्या प्रमाणात तुरी पडून आहे. मात्र खरेदी करणारी शासकीय यंत्रणा अत्यंत संथगतीने काम करीत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावात तूर विकावी लागत आहे.
आर्वी केंद्रावर शेतकऱ्यांनी तुरी विकण्यासाठी केलेल्या नोंदीपैकी केवळ १६० शेतकऱ्यांच्या तुरी मोजल्या आहे. त्यामुळे जून-जुलैपर्यंत येथे नंबर लागेल काय अशी शंका शेतकऱ्यांना आहे. रोहणा परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे तूरी पडून आहे. येथे पणन महासंघाचे मोठे गोदाम रिकामे पडून आहे. हे गोदाम तूर साठवणुकीला सहज उपलब्ध होवू शकते. रोहणा येथे नाफेडकडून तूर खरेदी सुरू करण्याची मागणी प्रमोद पांडे, बाबासाहेब गफाट, रघाटाटे, सरपंच सुनील वाघ, प्रकाश टाकळे आदींनी केली आहे.(वार्ताहर)