एस.टी.च्या तिकीट दरांमध्येही कपात व्हावी
By Admin | Updated: January 25, 2015 23:21 IST2015-01-25T23:21:54+5:302015-01-25T23:21:54+5:30
डिझेलचे दर नुकतेच २.६५ रुपये प्रतिलिटरने कमी झाले. असे असतानाही एसटीचे दर मात्र कमी करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवासी वर्गातून एस.टी.च्या तिकिटांचे दर कमी करावे अशी मागणी जोर धरत आहे.

एस.टी.च्या तिकीट दरांमध्येही कपात व्हावी
हिंगणघाट : डिझेलचे दर नुकतेच २.६५ रुपये प्रतिलिटरने कमी झाले. असे असतानाही एसटीचे दर मात्र कमी करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवासी वर्गातून एस.टी.च्या तिकिटांचे दर कमी करावे अशी मागणी जोर धरत आहे.
पूर्वी दर महिन्याला डिझेल दरात वाढ होत असल्याने एसटीच्या तिकीटांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली; परंतु १६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झाले. २.६५ प्रतिलिटरने डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आली. आता डिझेल २.६५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे राज्य परिवहनाच्या तिकीटाचे दरही कमी करण्याची मागणी समोर येवू लागली आहे.
प्रत्येक वेळा डिझेलच्या दरवाढीचे कारण देवून एसटीने तिकीटांमध्ये वेळोवेळी दरवाढ केली आहे. तीन महिन्यापूर्वी डिझेलचे दर प्रतिलिटर ६७.५० रुपये होते. त्यानंतर तीन वेळा त्यात कपात करण्यात आली.
आता तर नुकतीच आणखी २.६५ रुपयांनी कपात झाली. सध्याचे दर ५४.८८ रुपये आहेत. अर्थात मागील दरांपेक्षा आता तब्बल साडे बारा रुपये प्रतिलिटरने दर कमी झालेले असतानाही एसटीने तिकीटांचे दर कमी केलेले नाही. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात बसने प्रवास करतात. गावागावातील नागरिकांना शहरात येण्यासाठी अनेकदा बसचाच आधार असतो. असे असतानाही एस. टी. महामंडळ वारंवार भाडेवाढ करीत असते; परंतु वर्षभरात डिझेल १० ते १२ रुपयांपर्यंत कमी होऊनही एसटी महामंडळाने तिकिटांचे दर कमी केलेले नाही.
सर्व सामान्यांची जीवन वाहिनी म्हणून एसटी बसकडे पाहिल्या जाते. त्यामुळे राज्य शासनाने खंबीर भूमिका घेत महामंडळाचा चर्चा करावी आणि तिकिटांचे दर कमी करावे अशी मागणी प्रवासी वर्गातून वारंवार होत आहे. सामान्यांच्या खिशाचा विचार करीत तिकिटांचे दर लवकरात लवकर कमी करावे अशी मागणीही प्रवासी वर्गातून होत आहे.(शहर प्रतिनिधी)