एसटीचे चालक समृद्धी महामार्गाच्या कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 09:41 PM2020-11-09T21:41:51+5:302020-11-09T21:43:28+5:30

त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. तोटा भरून काढण्यासाठी एसटीने मालवाहतूकही सुरू केली. जून महिन्यापासून एसटीच्या काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या

ST drivers on Samrudhi Highway work | एसटीचे चालक समृद्धी महामार्गाच्या कामावर

एसटीचे चालक समृद्धी महामार्गाच्या कामावर

Next
ठळक मुद्देतीन महिन्यांपासून नाही वेतन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
एसटीतील कामगार आणि कर्मचाऱ्यांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून थकले आहे. यामुळे प्रचंड आर्थिक चणचण भासत असल्याने अनेक कामगार, कर्मचाऱ्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामावर जाण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या देशभरासह संपूर्ण राज्यात मार्च महिन्यापासून पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी, तब्बल सहा महिने एसटीची चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. तोटा भरून काढण्यासाठी एसटीने मालवाहतूकही सुरू केली. जून महिन्यापासून एसटीच्या काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतरच्या काळात जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यात आली. मालवाहतुकीकडून एसटीला बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले. मात्र, कोरोनामुळे एसटीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. यामुळे महामंडळाचा आर्थिक गाडा पूर्वपदावर आला नाही. यामुळे संपूर्ण राज्यात कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम झाला आहे. तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. यामुळे कर्मचारी, कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने एसटीचे चालक, कामगार यांनी चरितार्थ चालविण्यासाठी विविध लघु व्यवसाय स्वीकारले आहेत. तर काही चालकांनी समृद्धी महामार्गाच्या कामावर जाणे सुरू केले आहे. तर बस दुरुस्ती व इतर काम करणार्या कामगारांनीही खासगी वाहन दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला आहे. महामंडळाने वेतन तातडीने देण्याची गरज आहे.

फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्सही नाही
दिवाळी सण अवघ्या पाच दिवसांवर असताना महामंडळाकडून वेतनाचा प्रश्न निकाली काढला जात नसून फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्सही देण्यात आलेला नाही. यामुळे एसटीच्या कामगार कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय तणावात आहेत. दिवाळी सण साजरा कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला असून आर्थिक अडचणींचे संकट घोंगावत आहे.

अनेकांनी थाटला लघुव्यवसाय
राज्य परिवहन महामंडळात कार्यरत कर्मचारी, कामगारांना अतिशय तुटपुंजे वेतन मिळते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये वाहतूक उत्पन्न बंद झाल्याने कर्मचारी, कामगारांच्या वेतनावरही गंडांतर आले. बरेच महिने कर्मचाऱ्यांना निम्मेच वेतन देण्यात आले. तर ऑगस्टपासून वेतनच देण्यात आले नाही. त्यामुळे अनेकांनी लघुव्यवसाय थाटून उदरनिर्वाहाची व्यवस्था केली आहे. मात्र, यातही त्यांची आर्थिक ओढाताण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: ST drivers on Samrudhi Highway work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.