ST bus stops due to floods | नाल्याच्या पुरामुळे रापमची बस अडकली
नाल्याच्या पुरामुळे रापमची बस अडकली

ठळक मुद्देभिवापूर येथील घटना : शैक्षणिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वायगाव (नि.) नजीकच्या भिवापूर गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे हिंगणघाट मार्गे मनसावळीला जाणारी बस अर्ध्या प्रवासातच अडकली. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ही परिस्थिती ओढावली असली तरी विद्यार्थ्यांना मात्र शैक्षणिक फटकाच सहन करावा लागला.
वर्धा-हिंगणघाट मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने वर्धा-मनसावळी एम.एच. ४० एन.८९९३ क्रमांकाची बस भिवापूर मार्गे नेण्यात आली. मात्र, मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तळेगाव व भिवापूरच्या मधोमध असणाऱ्या नाल्याला पूर आला. पूर्वीच या नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. अशातच मुसळधार झालेल्या पावसामुळे नाल्याच्या पाणी पातळीत वाढ होत पुराचे पाणी नाल्याच्या पुलावरूनही वाहत होते. परिणामी, बसही पुढील प्रवासासाठी जाऊ शकली नाही. या बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते. शिवाय या प्रवाशांपैकी जास्तीत जास्त प्रवासी शिक्षणासाठी ये-जा करणारे विद्यार्थी होते. परंतु, नियोजित ठिकाणी बसच पोहोचू शकली नसल्याने याचा शैक्षणिक फटकाच त्यांना सहन करावा लागला आहे. पुरामुळे शाळेत न पोहोचू शकणाºया विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांचे प्रॉक्टिकल व मुलाखत होत्या. परंतु, त्यापासून मुकावे लागले आहे.


Web Title: ST bus stops due to floods
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.