सक्तीच्या संचारबंदीला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:00 IST2021-02-22T05:00:00+5:302021-02-22T05:00:02+5:30

सक्तीच्या संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वर्धा शहरात पोलीस, महसूल, नगरपालिकेच्या एकूण नऊ पथकांनी विशेष प्रयत्न केले. सक्तीच्या संचारबंदीचे नागरिकांकडून पालन होतेय काय याची प्रत्यक्ष पाहणी उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, वर्धा न. प. चे मुख्याधिकारी विपीन पालिवाल यांनी वर्धा शहराचा फेरफटका मारून केली. रविवारी शहरातील औषधीची दुकाने वगळता सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती.

Spontaneous response of citizens to forced curfew | सक्तीच्या संचारबंदीला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद

सक्तीच्या संचारबंदीला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद

ठळक मुद्दे२५ कोटींच्या उलाढालीला लागला ब्रेक : बेशिस्तांवर पोलीस, महसूल, राजस्व विभागाच्या पथकाने केली दंडात्मक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :  कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाच्यावतीने ३६ तासांची सक्तीची संचारबंदी जाहीर करण्यात आली. या संचारबंदीच्या काळात प्रत्येक नागरिकाने घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला वर्धा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी रविवारी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. असे असले तरी रविवारी जिल्ह्याचे मुख्यालय असलेली वर्धा बाजारपेठ बंद राहिल्याने सुमारे २५ कोटींच्या उलाढालीला ब्रेक लागला होता.
सक्तीच्या संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वर्धा शहरात पोलीस, महसूल, नगरपालिकेच्या एकूण नऊ पथकांनी विशेष प्रयत्न केले. सक्तीच्या संचारबंदीचे नागरिकांकडून पालन होतेय काय याची प्रत्यक्ष पाहणी उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, वर्धा न. प. चे मुख्याधिकारी विपीन पालिवाल यांनी वर्धा शहराचा फेरफटका मारून केली. रविवारी शहरातील औषधीची दुकाने वगळता सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. तर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्रत्येक व्यक्तीला थांबवून केली जात होती विचारपूस
सक्तीच्या संचारबंदीदरम्यान प्रत्येक नागरिकाने घरात थांबण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. इतकेच नव्हे अतिशय महत्त्वाच्या कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धा शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांच्यावतीने नाकेबंदी करण्यात आली होती. या नाकेबंदी दरम्यान प्रत्येक व्यक्तीला थांबवून पोलीस कर्मचारी विचारपूस करीत होते. कुणी विनाकारण घराबाहेर पडला आहे हे स्पष्ट होताच त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

अनेकांनी विवाहसोहळे ढकलले पुढे

रविवार २१ फेब्रुवारी हा लग्नाचा मुहूर्त होता. अनेकांनी मंगलकार्यालय आरक्षीत करून याच दिवशी विवाहसोहळे आयोजित केले होते. परंतु, २० पेक्षा जास्त लोकांना लग्नसोहळ्यात सहभागी होता येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल्याने काहींनी विवाह सोहळे पुढे ढकलले तर काहींनी बोटावर मोजण्या इतक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने विवाह सोळा पार पाडला. पार पडलेल्या विवाह साेहळ्यादरम्यान जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यात आले.
 

जिल्हा सामान्य रुग्णालय होते अलर्टवर
रविवारी संचारबंदीमुळे वर्धा शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने बंदी होती. परंतु, कुठल्याही रुग्णाला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्तव्यावर असलेले डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी अलर्टवर होते.

शहरातील मुख्य बाजापेठ होती पुर्णपणे बंद
कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या ३६ तासांच्या संचारबंदीमुळे जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील संपूर्ण बाजारपेठ केवळ औषधीची दुकाने वगळता पूर्णपणे बंद होती.

रापमला बसला २५ लाखांचा फटका
सक्तीच्या संचारबंदीदरम्यान रविवारी खासगी ट्रॅव्हल्ससह राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा बंद होती. ३६ तासांच्या सक्तीच्या संचारबंदीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रवासी बसेस जिल्ह्यातील पाचही आगारात उभ्या होत्या. त्यामुळे रापमचा ३६ तासांच्या संचारबंदीचा किमान २५ लाखांचा आर्थिक फटका बसला.
बसस्थानक होते ओस
सक्तीच्या संचारबंदीदरम्यान रापमची बससेवा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्याने ऐरवी प्रवाशांनी गजबजून राहणारे वर्धा बसस्थानक रविवारी मात्र ओस होते.
 

प्रमुख रस्ते होते निर्मनुष्य
वर्धा शहरातील बजाज चौक, आर्वी नाका चौक, शास्त्री चौक, सोशालिस्ट चौक, अंबीका चौक या परिसरात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. परंतु, रविवारी सक्तीच्या संचारबंदीमुळे शहरातील या महत्त्वाच्या ठिकाणांसह इतर भागातील रस्ते निर्मनुष्य होते.

 

Web Title: Spontaneous response of citizens to forced curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.