पारडीत चितेच्या ठिणगीने आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:49 IST2018-04-30T22:49:49+5:302018-04-30T22:49:59+5:30
शेतात जळत असलेल्या चितेच्या आगीने दोन गोठ्याची राख झाल्याची घटना तळेगाव (श्यामजीपंत) परिसरातील पारडी येथे घडली. या आगीत घरातील साहित्याचा कोळसा झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.

पारडीत चितेच्या ठिणगीने आग
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्यामजीपंत) : शेतात जळत असलेल्या चितेच्या आगीने दोन गोठ्याची राख झाल्याची घटना तळेगाव (श्यामजीपंत) परिसरातील पारडी येथे घडली. या आगीत घरातील साहित्याचा कोळसा झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
तळेगाव पोलीस ठाण्यांतर्गत पारडी या गावात गोपाल दातीर यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज पार पडला. अख्ये गाव हा अंत्यविधी आटोपून घरी परतले. येथून काहीच वेळात चितेच्या आगीची ठिणगी जवळच असलेल्या राजेंद्र डायरे व गणपत शेंदरे यांच्या गोठ्यावर पडली. या ठिणगीने क्षणातच आग भडकली. आगीने गोठ्यातील शेतीसाहित्याची अगदी राख झाली. या गोठ्यात साहेबराव सपकाळ यांचा गोºहा बांधून होता. हा गोºहा पूर्णपणे जळाला. त्याचप्रमाणे या गोठ्यात ठेवून असलेला मोटारपंप, पाईप, कुटार, वखर, आदि साहित्याचा कोळसा झाला.
आगीवर नियंत्रण आणण्यासाठी आर्वी नगर परिषदेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले; परंतु गावातील रस्ते अरूंद असल्यामुळे व विजेच्या तारा आडव्या आल्याने बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी विलंब झाला. याच वेळी तळेगाव येथील सी-डेट कंपनीतील पाण्याच्या टॅँकरला सुध्दा पाचारण करण्यात आले.
घटनेची माहिती येथील जमादार करीम शेख यांनी ठाण्यात दिली. यानंतर उपनिरीक्षक राठोड घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थितीवर ताबा मिळविता आला.