झाडे वाळू लागली : मॅग्नेशियमची कमतरता तसेच जीवाणूंच्या संक्रमणामुळे अवस्थावर्धा : सोयाबीनच्या अत्यल्प उतारीने शेतकरी चिंतातूर झाला असताना कपाशीचेही उत्पन्न त्याच्या हातून जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच भागातील कपाशीची उभी झाडे वाळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कपाशीकडून असलेली आशाही मावळली आहे. जिल्ह्यात सर्वत्र दिसत असलेल्या या पीक परिस्थितीची माहिती कृषी विभागाला मिळताच सेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांसह कृषी विभागाच्या जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी पिकांची पाहणी करणे सुरू केले आहे. त्यांनी केलेल्या पाहणीत मॅग्नेशियमची कमतरता तसेच जीवाणूंच्या संक्रमनामुळे पिकांची परिस्थिती दयनीय होत असल्याचे समोर आले आहे. यावर त्यांच्याकडून काही उपयोजनाही सांगण्यात सूचविण्याात आल्या आहेत. वर्धा तालुक्यातील बरबडी, पवनार, धामणगाव, खानापूर येथील कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला व मोसंबी, सीताफळ आदी पिकांच्या परिस्थितीची पाहणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.ए. भारती, सेलसुरा किटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रदीप दवणे, जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय खळीकर, सर्व उपविभागीय कृषी विकास अधिकारी, तालुका कृषी विकास अधिकारी यांनी पाहणी केली. त्यांना कपाशीची उभे पीक वाळत असल्याचे दिसून आले आहे. शिवाय कपाशीवर हिरव्या बोंड अळीसह, रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, फुल किडे, पाने गुंडाळणाऱ्या अळ्या व पिठ्या ढेकुणचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या किडीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आाहे. कृषी विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीत हे वास्तव समोर आल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांना व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. (प्रतिनिधी)
सोयाबीनपाठोपाठ कपाशीही धोक्यात
By admin | Updated: October 10, 2015 02:34 IST