सोयाबीनला फुटले कोंब; तालुक्यातील शेतकरी मारतोय बोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST2021-09-27T05:00:00+5:302021-09-27T05:00:07+5:30

मागील १५ दिवसांपासून तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. नदी व नाल्यांच्या काठावरील काही शेतकऱ्यांचे उभे पीक पुरामुळे वाहून गेले, तर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेत जलमय झाले आहे. याचाच विपरित परिणाम सध्या उभ्या पिकांवर झाला असून, आर्वी तालुक्यातील सहा महसूल मंडलातील १ हजार ८११ शेतकऱ्यांचे एक हजार हेक्टरवरील उभ्या पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याची नोंद तालुका प्रशासनाने घेतली आहे.

Soybean sprouts; Farmers in the taluka are being bombed | सोयाबीनला फुटले कोंब; तालुक्यातील शेतकरी मारतोय बोंब

सोयाबीनला फुटले कोंब; तालुक्यातील शेतकरी मारतोय बोंब

सुरेंद्र डाफ
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : सततच्या पावसामुळे आर्वी तालुक्यातील सहा महसूल मंडलातील १ हजार ८११ शेतकऱ्यांच्या एक हजार हेक्टरवरील उभ्या पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. सध्या उभ्या सोयाबीन पिकाला कोंब फुटल्याने मायबाप सरकार हवालदिल शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देता का हो, अशी बोंब मारत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
मागील १५ दिवसांपासून तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. नदी व नाल्यांच्या काठावरील काही शेतकऱ्यांचे उभे पीक पुरामुळे वाहून गेले, तर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेत जलमय झाले आहे. याचाच विपरित परिणाम सध्या उभ्या पिकांवर झाला असून, आर्वी तालुक्यातील सहा महसूल मंडलातील १ हजार ८११ शेतकऱ्यांचे एक हजार हेक्टरवरील उभ्या पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याची नोंद तालुका प्रशासनाने घेतली आहे. नुकसान झालेल्या उभ्या पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी पिकांचा समावेश आहे.
सध्या शेतकरी सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत असले तरी ढगाळ वातावरण तसेच उसंत घेत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या  शेंगानाच कोंब फुटले आहेत. एकूणच तालुक्यातील शिरपूर, जळगाव, लाडेगाव, एकलारा, टाकरखेडा, वर्धमनरी, मांडला, निंबोली (शेंडे), राजापूर, कर्माबाद, अहिरवाडा, खुबगाव, पाचेगाव, बोरगाव, दहेगाव (मु.) आदी गावांमधील उभ्या पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. शासन नुकसान भरपाई देते काय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

उत्पादनात येणार घट
- सततच्या पावसाचा आर्वी तालुक्यातील उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. सोयाबीनच्या शेंगांना सध्या कोंब फुटले असून, उत्पादनात घट येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे. सोयबीनच्या  शेंगांना कोंब फुटले असून, शासनाने नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादकांना भरपाई द्यावी.
- भास्कर चौकोने, शेतकरी, दहेगाव (मु.).

पावसामुळे तालुक्यातील किती हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले, याचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन, तूर व कापूस पिकाला बसला आहे. त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.
- एस. व्ही. वायवळ,  तालुका कृषी अधिकारी, आर्वी.
 

 

Web Title: Soybean sprouts; Farmers in the taluka are being bombed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.