साधलेल्या दुबार पेरण्या अतिवृष्टीने दडपल्या

By Admin | Updated: July 28, 2014 23:41 IST2014-07-28T23:41:26+5:302014-07-28T23:41:26+5:30

यंदा कोरडा गेलेल्या मृग नक्षत्राच्या शेवटी व आर्द्रा नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या एक-दोन वादळी पावसाने शेतजमिनी न्हाऊन निघाल्या़ यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण नंतर पुर्नवसू

The sowing of sowners is overwhelmingly sown | साधलेल्या दुबार पेरण्या अतिवृष्टीने दडपल्या

साधलेल्या दुबार पेरण्या अतिवृष्टीने दडपल्या

खरांगणा (मो़) : यंदा कोरडा गेलेल्या मृग नक्षत्राच्या शेवटी व आर्द्रा नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या एक-दोन वादळी पावसाने शेतजमिनी न्हाऊन निघाल्या़ यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण नंतर पुर्नवसू नक्षत्रापर्यंत पाऊसच आला नाही़ यात सर्व बियाणे नष्ट झाले़ यानंतर १७-१८ तारखेपासून पावसाच्या सरी कोसळल्याने दुबार पेरण्या केल्या़ काही शेतकऱ्यांचे बियाणे अंकुरले; पण सोमवार, मंगळवारी अतिवृष्टीने झाल्याने ते ही दडपल्या गेले़ अस्मानी संकटाच्या फटक्याने शेतकरी संकटात सापडला आहे़
परिसरात कपाशी, सोयाबीन व तूर ही मुख्य पिके आहेत़ मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचा फटका बसल्याने यावर्षी कपाशीचा पेरा वाढलेला दिसून येतो़ ओलिताची सोय असलेले शेतकरी वगळता कपाशी व तूर या पिकांची दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली़ पेरण्या साधल्या, बियाणे अंकुरले; पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत बियाणे दडपले गेले़ काही ठिकाणी बियाणे वाहून गेले तर काही शेतात गाळात रूतली़ यामुळे शेतकऱ्यांचे अवसान गळाले असून कर्जाचा डोंगर त्याच्या वाढला आहे़ सोयाबीनची पेरणी झालेले बियाणे तर जमिनीत गायब झाले आहे़ ज्या ठिकाणी पाणी साचले आहे, तेथील अंकुर सडण्याच्या मार्गावर आहे़ यामुळे शेतकऱ्यांना तिसऱ्यांदा पेरणी केल्याशिवाय पर्याय नाही़ पीक कर्जाची रक्कम बियाण्यांतच खर्ची पडली तर समोरची मशागत, खते, औषधी, निंदण, खुरपन ही कामे कशी करावीत, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे़
मागील वर्षी पावसाची नक्षत्रे संपल्यानंतरही संततधार पाऊस होता़ यामुळे सोयाबीनचे उत्पन्न अपवाद वगळता पूर्णत: बुडाले़ जे निघाले त्यालाही किंमत आली नाही़ कपाशीचे उत्पन्न जेमतेम झाले़ यात भाववाढीच्या अपेक्षाही धुळीस मिळाल्या़ त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यास बसला़ अनेकांना कर्जाची परतफेड करता आली नाही म्हणून यावर्षी पुन्हा सावकाराच्या दारी जावे लागले़ ग्रामीण व शहरी भागातील कृषीकेंद्र चालकांनी व्याजबट्ट्याचे तोंडी करार करून बियाणे, खते, औषधी शेतकऱ्यांना पुरविणे सुरू केले आहे़ एवढेच नव्हे तर मशागतीकरिता लागणारा खर्चही नगदी स्वरूपात दुकानदाराजवळून शेतकरी पर्याय नसल्याने व्याजाने घेत आहे़ दुकानदार शेतीसाहित्याच्या मालाची आगाऊ बिले फाडून शेतकऱ्यांच्या उधारी खात्यावर वळते करतो़ इतर अवैध सावकारी करणारे खोडा खरेदीचे आधारभूत भाव (निघणाऱ्या उत्पन्नाचे) आताच ठरवून शेतमाल शेतकऱ्यांच्या घरी आल्याबरोबर मोजून आपल्या घरी नेतो़ असा हा शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत लोटणारा प्रकार जोमाने सुरू झाला आहे़ अवैध सावकारी नष्ट करण्याच्या हेतूने केलेला सावकारी अधिनियम कायदा या व्यवहारांना आड येत असल्याचे समजते़
एकंदरीत शेती व संसाराची वहीवाट करताना अस्मानी व सुलतानी संकटाशी शेतकऱ्याला लढावे लागत आहे़ कर्जाचा डोंगर चढत असल्याने मुलींचे लग्ने, शिक्षण, आजार व जनावरांची हानी या दुष्टचक्रातून बाहेर पडणे अशक्य होत आहे़ यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे सध्या गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)

Web Title: The sowing of sowners is overwhelmingly sown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.