केंद्रीय पथकाने जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
By Admin | Updated: December 16, 2014 22:57 IST2014-12-16T22:57:02+5:302014-12-16T22:57:02+5:30
जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्याकरिता केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाले. ठरल्याप्रमाणे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सदर पथक विजयगोपाल येथे दाखल झाले.

केंद्रीय पथकाने जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
चार गावांना भेट : शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतीची पाहणी; अधिकाऱ्यांचीही हजेरी
वर्धा : जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्याकरिता केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाले. ठरल्याप्रमाणे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सदर पथक विजयगोपाल येथे दाखल झाले. येथील माहिती घेतल्यानंतर सदर पथक इंझाळा, कवठा व वर्धा तालुक्यातील कुरझडी या गावातील माहिती घेतली.
पथकात केंद्र शासनाच्या पाणी पुरवठा व जलनिसारण विभागाचे सहायक सल्लागार विजयकुमार बादला, पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक चंद्रशेखर साहुरकर, कापूस अनुसंधान विभागाचे संचालक आर.पी. सिंग, राज्य शासनाचे उपसचिव मंदरा पोहरे व अवर सचिव श्रीनंद घोलप यांची उपस्थिती होती.
विजयगोपाल येथे या पथकाच्या सदस्यांनी शेतीची पाहणी केली. विजयगोपाल येथील पैसेवारी ४८ च्या आत असल्याने केंद्रातून आलेल्या पथकाने किशोर मारोती झोरे यांच्या शेतात जाऊन त्या शेतीची पाहणी केली. यावेळी पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. झोरे यांना उत्पन्नासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी तीन एकर शेतात २० किलो कापूस झाल्याचे सांगितले. याकरिता ५० हजार रुपये खर्च झाल्याचे सांगताच पथकातील अधिकारी अवाक् झाले. एवढा खर्च झाल्याने आता जगावे कसे, सावकाराचे व बँकेचे कर्ज, कृषी केंद्राचे कर्ज कसे द्यायचे, असा प्रश्न या शेतकऱ्याने पथकातील अधिकाऱ्यांना विचारताच ते निरूत्तर झाले.
शेतकरी बाळाजी केशव म्हसे यांच्याशी पथकाने संवाद साधला असता त्यांनी १२ एकर शेतीत १२ किलो कापूस घरी आलेला नाही. राहायला मालकीचे घर नाही. सावकरी व बँकेचे कर्ज डोक्यावर असल्याच्या व्यथा मांडल्या.
विजयगोपाल येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्याचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याकरिता केंद्रीय पथकाच्या स्वाधीन केले. यावेळी सरपंच निलम बिन्नोड यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा पथकासमोर मांडल्या. यावेळी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयगोपाल येथील शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर पथक त्यांच्या कार्यक्रमात असलेल्या इंझाळा या गावाकडे रवाना झाले. इंझाळा येथील शेतकरी बाबाराव सरडे यांची भेट घेत शेतीची पाहणी केली. या गावातून अवघ्या तीन मिनिटात पथक कवठा येथील मधुकर राऊत यांच्या शेताची पाहणी करून वर्धा तालुक्यातल कुरझडी येथे आले. तेथून ते वर्धेत दाखल झाले. यावेळी वर्धेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)