‘होम क्वारंटाईन’ कुटुंबांवर सोशल पोलिसांचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:00:19+5:30
सामाजिक संघटनेचा प्रतिनिधी असलेल्या हा सोशल पोलीस सदर होम क्वारंटाईन कुटुंबातील कुठला व्यक्ती घराबाहेर पडतो काय याबाबतची माहिती गोपनीय पद्धतीने घेऊन त्याची रिपोर्टींग थेट जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना करणार आहे. कुणी व्यक्ती होम क्वारंटाईनच्या नियमांना बगल देताना आढळल्यास त्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबाला इन्स्ट्युशनल क्वारंटाईन करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

‘होम क्वारंटाईन’ कुटुंबांवर सोशल पोलिसांचा ‘वॉच’
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : होम क्वारंटाईनच्या नवीन रणनीतीनुसार कोरोना बाधित जिल्ह्यातून येणाºया व्यक्तीसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आता होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे होम क्वारंटाईन असलेल्या दहा कुटुंबावर वॉच ठेवण्यासाठी एक सोशल पोलीस नियुक्त करण्यात आला आहे. सामाजिक संघटनेचा प्रतिनिधी असलेल्या हा सोशल पोलीस सदर होम क्वारंटाईन कुटुंबातील कुठला व्यक्ती घराबाहेर पडतो काय याबाबतची माहिती गोपनीय पद्धतीने घेऊन त्याची रिपोर्टींग थेट जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना करणार आहे. कुणी व्यक्ती होम क्वारंटाईनच्या नियमांना बगल देताना आढळल्यास त्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबाला इन्स्ट्युशनल क्वारंटाईन करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा शहर किंवा ग्रामीण भागात प्रत्येक दहा होम क्वारंटाईन कुटुंबावर एक सोशल पोलिसाची करडी नजर राहणार आहे. हा सोशल पोलीस ग्रामीण भागात वॉर्ड तसेच शहरी भागात प्रभाग निहाय नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्याला आपला दैनंदिन अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर हा नोडल अधिकारी सोशल पोलिसाकडून प्राप्त झालेली माहिती न.प. मुख्याधिकारी, तहसीलदार तसेच उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांना देणार आहे.
या साखळी पद्धतीने होम क्वारंटाईन कुटुंबाची माहिती झटपट जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना मिळणार आहे. जो होम क्वारंटाईन व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य गृहविलगीकरणाच्या कालावधीत घराबाहेर पडेल त्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबीयांना इन्स्ट्युशनल क्वारंटाईन करून त्या कुटुंबातील सदस्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे होम क्वारंटाईन व्यक्तीसह त्याच्या कुटुंबातील कुठलाही व्यक्तीला घराबाहेर पडणे चांगलेच महागात पडणार आहे. कुठल्याही परिस्थितीत वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन ही नवी रणनीती आखून त्यावर प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.
घरपोच मिळणार जीवनावश्यक साहित्य
होम क्वारंटाईन असलेल्या कुटुंबाला जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच केला जाणार आहे. त्यासाठी अॅप तयार करण्यात आले आहे. कोरोना बाधित जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात आलेल्यानंतर होम क्वारंटाईनचा शिक्का मारताना सदर व्यक्तीच्या मोबाईलमध्ये सदर अॅप इन्स्टॉल करण्यात येणार आहे. याच अॅपच्या माध्यमातून होम क्वारंटाईन कुटुंबाला औषध, दुध, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरपोच करण्यात येणार आहे.
१०० स्वयंसेवक देणार सेवा
सोशल पोलीस म्हणून वर्धा उपविभागात तब्बल १०० स्वयंसेवक सेवा देणार आहेत. या स्वयंसेवकांना होम क्वारंटाईन कुटुंबाबत गोपनीय पद्धतीने माहिती कशी काढावी याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
साथरोग कायद्याच्या कलम १८८ अन्वये कारवाईस जावे लागणार पुढे
कोरोना बाधित क्षेत्रातून आलेल्या व्यक्तीसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. होम क्वारंटाईन कालावधीत सदर कुटुंबातील कुठलाही व्यक्ती घराबाहेर पडल्यास त्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबीयांना इन्स्ट्युशनल क्वारंटाईन करून त्या व्यक्तींवर साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
घरावर लिहिणार ‘एच क्यू’
कोरोना बाधित क्षेत्रातून आलेल्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबाला आता होम क्वारंटाईन केले जात आहे. इतर घरांपेक्षा होम क्वारंटाईन असलेल्या कुटुंबाचे घर चटकन ओळखता यावे यासाठी या घराच्या दर्शनिय भागावर रंगाच्या सहाय्याने ‘एच क्यू’ असे लिहिले जाणार आहे. इतकेच नव्हे तर सदर कुटुंबाचा होम क्वारंटाईनचा कालावधी केव्हा संपतो याची तारीखही सदर घराच्या दर्शनिय भागावर लिहिली जाणार आहे.
कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून कोरोना बाधित क्षेत्रातून आलेल्या व्यक्तीसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आता होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर त्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या जाणार आहेत. होम क्वारंटाईन काळात होम क्वारंटाईन कुटुंबातील कुठला व्यक्ती घराबाहेर पडल्यास त्या व्यक्तीसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला इन्स्ट्युशनल क्वारंटाईन करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
- सुरेश बगळे, उपविभागीय न्याय दंडाधिकारी, वर्धा.