विघ्नहर्त्याच्या मूर्तीला तिसरी पिढी देतेय आकार
By Admin | Updated: August 12, 2014 00:06 IST2014-08-12T00:06:41+5:302014-08-12T00:06:41+5:30
मराठी माणसाचे लाडके दैवत विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाला केवळ १५ दिवस राहिलेत़ पावसाचा लहरीपणा, उन्ह-पावसाचा लपंडाव, मूर्ती बनविण्यासाठी लागणारी माती, रंग व अन्य साहित्य याची भाववाढ,

विघ्नहर्त्याच्या मूर्तीला तिसरी पिढी देतेय आकार
प्रभाकर शहाकार - पुलगाव
मराठी माणसाचे लाडके दैवत विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाला केवळ १५ दिवस राहिलेत़ पावसाचा लहरीपणा, उन्ह-पावसाचा लपंडाव, मूर्ती बनविण्यासाठी लागणारी माती, रंग व अन्य साहित्य याची भाववाढ, मजुरीचे वाढते दर आणि काही भागात दुष्काळी स्थिती या चौफेर समस्या व महागाईच्या सावटात श्रीगणेश यंदा चांगलेच अडकलेत! यंदा गणेश मुर्तीच्या किमती ५० टक्के वाढणार असल्याचे दिसत आहे़
एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या पुलगावच्या गणेशोत्सवात गणेशमूर्तीच्या विक्रीतून सुमारे ७० लाखांची आर्थिक उलाढाल होत असे़ हिंगणघाटफैल येथील कुंभारपुऱ्यात सुमारे १३ ठिकाणी गणेशाच्या मूर्ती साकारण्याचे काम जोमाने सुरू आहे़ मूर्तीकार अरुण गाते यांच्या कुटुंबाची तिसरी पिढी सध्या गणेश मूर्त्या साकारत आहे़ आदित्य व गणेश ही भावंडे विघ्नहर्त्या गणेशाच्या मूर्ती घडविण्याचा वारसा ८० वर्षानंतरही कायम ठेवून आहे़ पुलगाव कॉटन मिलच्या वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा विद्यमान प्रशासनाच्या धोरणामुळे खंडित झाली असली तरी पुलगावकरांचे गणेशोत्सवाचे सातत्य कायम आहे़ शहरात जवळपास ३५-४० तर ग्रामीण भागात ४०-४५ अशी ९०-९५ सार्वजनिक गणेश मंडळे कार्यरत आहे़ या मंगलमय पर्वासाठी शहरात पुणे, नागपूर, अमरावती, वर्धा, धामणगाव येथील एकापेक्षा एक सरस गणेशमूर्त्या भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात़ नामवंत मूर्तीकार नागोराव इंगळे यांचे पुत्र सुरेश इंगळे व वारसाहक्काने तिसऱ्या पिढीतील नातू निखील व स्वप्नील तसेच सुरेश ठाकूर, प्रजापती, बबलू राठोड ही मूर्तीकार मंडळीही ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून गणेश मूर्ती साकारीत आहे़ दहा वर्षांपासून कुंभारपुऱ्यातील गाते परिवारातील संजय गाते, पवन गाते, दिलीप गाते, उत्तम पातर, नामदेव करवाडे, गणेश वालदे, बिसन पडवार अशी १५-२० कुटुंबे गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करीत आहे़
हिंगणघाटफैल येथील रामचंद्र गाते यांनी ८० वर्षांपूर्वी गणशेमूर्तीचा व्यवसाय सुरू केला़ त्यानंतर आदित्य व गणेश ही भावंडे मूर्ती साकारण्याचा पिढीजात वारसा जोपासत आहे़ शासनाने प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तीवर बंधन टाकल्याने आता मूर्ती चॉक मातीच्या बनविल्या जात आहे़ माती व साहित्याचे दर वाढले असून गोल्डन रंगाची किंमत वाढली़ ३ हजार रुपयांत मिळणारा डबा ४ हजार ५०० रुपये तर एशियन रंगाच्या किमतीत झालेली वाढ, मजुरीचे वाढते दर यामुळे यंदा गणेशाच्या मूर्ती महाग होईल़ वाढत्या महागाईमुळे मूर्तीच्या किमतीत जवळपास ५० ते ६० टक्के वाढ होणार आहे़ दुष्काळग्रस्त परिस्थितीने या व्यवसायावरही मंदीची लाट येऊ शकते, अशी खंत निखील इंगळे यांनी व्यक्त केली़
स्थानिक मुर्तीसह वर्धा, बडनेरा, धामणगाव, अमरावती, तळेगाव येथून गणेश मूर्ती विक्रीसाठी येतात़ या काळात गणेश मूर्ती व्यवसायातून किमान ७० ते ८० लाखांची आर्थिक उलाढाल होते़ यामुळे किमान १०० ते १५० बेरोजगारांना काम मिळते तर १८-२० कुटुंबाचा वर्षभराचा गाडा चालतो़ स्थानिक मूर्तीकार कलात्मक मूर्ती साकारत असल्याने अनेक मंडळांतून ही कला प्रदर्शित होणार आहे़