गावांतील शीवपांदण रस्ते दुर्लक्षित
By Admin | Updated: August 22, 2014 00:04 IST2014-08-22T00:04:21+5:302014-08-22T00:04:21+5:30
राजस्व अभियानांतर्गत शेताकडे जाणारे शीवपांदण रस्ते मोकळे करून शेतकऱ्यांना शेती वहिवाटीसाठी पक्का रस्ता तयार करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. असे असले तरी कोरा, वासी, मंगरुळ,

गावांतील शीवपांदण रस्ते दुर्लक्षित
वर्धा : राजस्व अभियानांतर्गत शेताकडे जाणारे शीवपांदण रस्ते मोकळे करून शेतकऱ्यांना शेती वहिवाटीसाठी पक्का रस्ता तयार करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. असे असले तरी कोरा, वासी, मंगरुळ, खापरी, खेक, एकुर्डी, चिखली येथील गावांचे शीवपांदण रस्ते अद्याप दुर्लक्षित असल्याचे दिसले़ यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाताना त्रास सहन करावा लागत आहे़
मागील निवडणुकीत प्रचारात शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी पक्का रस्ता, शीवपांदण रस्ते मोकळे करून देण्याची ग्वाही देण्यात आली होती; पण हे आश्वासन हवेतच विरले. या योजनेचा शेतकरी, शेतमजुरंना कुठलाही फायदा झाला नाही. शीवपांदण आणि रहदारीच्या रस्त्यांवर अतिक्रमण करून रस्ते अरूंद करण्याचा प्रकार वाढत असल्याचे दिसते़ कोरा येथील शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतावर जाताना चिखली पांदण रस्ता, नारायणपूर पांदण, वानरचुवा, सोनापूर शीव रस्ता, सातघरी शिव, चापापूर येथील शीवपांदण, वासी येथील चोपण रस्ता अशा अनेक शिवारात रस्त्यांची समस्या आहे. पावसाळ्यात शेतात बैलबंडी, ट्रॅक्टर वा पायदळ जातानाही चिखल आणि भालदार काट्यातून वाट काढावी लागते.
एकेकाळी मोठे असलेले शीवपांदण रस्ते वहिवाटीस अरुंद झाले आहे. शीवपांदणीचा पुरावा समजला जाणारा मोजणीची हद्द म्हणून गाडलेला शासकीय दगड पूर्णत: जमिनीत पूरला जातो़ यावरून कायद्याचा कुठलाही धाक नसल्याचेच दिसते़ ओळख म्हणून असलेले शासकीय दगड शेतकऱ्यांनी नाहिसे केले. कित्येकांनी रस्त्यावर काटेरी कुंपण तर काहींनी लोखंडी, सिमेंटचे खांब शासकीय जागेच्या हद्दीत गाडून रस्ते अरुंद केलेत़ यामुळे दरवर्षी रस्ते अरुंद होत असून काटेरी जंगल वाढत आहे़ याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)