पिण्याच्या पाण्याचा असाही व्यवसाय
By Admin | Updated: May 20, 2014 23:50 IST2014-05-20T23:50:59+5:302014-05-20T23:50:59+5:30
लोकांची अडचण, त्यांची मानसिकता याचा फायदा घेत अनेक व्यवसाय थाटले जातात; पण येथील एका पानठेला चालकाने सुरू केलेला पाण्याचा व्यवसाय अफलातून ठरतोय़

पिण्याच्या पाण्याचा असाही व्यवसाय
सेलू : लोकांची अडचण, त्यांची मानसिकता याचा फायदा घेत अनेक व्यवसाय थाटले जातात; पण येथील एका पानठेला चालकाने सुरू केलेला पाण्याचा व्यवसाय अफलातून ठरतोय़ हा व्यवसाय ग्राहकांना परवडणारा असून १५ रुपयांची तहान येथे पाच रुपयांत भागविली जात आहे़ हा प्रयोग लहान वाटत असला तरी चमत्काराच्या पलीकडचा आहे. बसस्थानकाजवळ एका पानठेला चालकाने ही शक्कल लढविली आहे़ सर्वसामान्य माणूस पाण्याच्या थंडगार बॉटलकरिता अकारण १५ ते २० रुपये खर्च करतो. सर्वसामान्य माणूस पाच रुपयांत दोन पाणी पाऊचमधील पाणी पिऊन करून तहान भागवितो़ यापेक्षा आपण थंडगार शुद्ध पाणी केवळ पाच रुपयांत देऊ शकतो, ही कल्पना त्याच्या डोक्यात आली़ ही कल्पना त्याने प्रत्यक्षात उतरवित पानठेल्यासोबत स्वस्त व शुद्ध थंड पाण्याचा व्यवसाय सुरू केला़ शुद्ध थंड पाणी स्वस्तात मिळत असल्याने पानठेल्याची आवकही वाढली. हा पानठेला चालक ३० ते ३५ रुपयांत मिळणार्या थंडगार पाण्याची २० लिटरची (कॅन) वाटरबॅग घेतो. पानठेल्याच्या काऊंटरवर ती ठेऊन ग्राहकाला पाच रुपयांमध्ये जवळची बाटली भरुन पिण्यासाठी देतो़ पाणी पिऊन झाल्यानंतर बाटली परत घेतो. ग्राहकाच्या समोर वाटरबॅगचा नळ सुरू करून बाटली भरून देतो. यामुळे ग्राहकांनाही शुद्ध व थंड पाणी पिऊन हायसे वाटते. अलीकडे १५ ते २० रुपयांची बाटली खरेदी न करता तहानलेले नागरिक ५ रुपयांत येथे तहाण भागवित असल्याचे दिसते़ पानठेला चालकाच्या या कल्पनेला लोक दाद देत आहेत़ नुकत्याच सुरू केलेल्या त्यांच्या या व्यवसायाला तेजी आल्याचे दिसते़ ५ रुपयांत थंड पाणी मिळत असल्याने नागरिकांनाही दिलासा मिळतोय़(तालुका प्रतिनिधी)