नदीपात्राला जलपर्णीसह झुडपांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:19+5:30
श्रावण महिन्यापासून हिंदू धर्मियांचे धार्मिक सण व्रत वैकल्याला सुरुवात होते. गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नदीपात्रात गावातील महिला हरितालीकेला गौरी पूजन तसेच विसर्जन करतात. तसेच नागरिकही घरगुती गणपतीचे विसर्जन व धार्मिक विधी या नदीपात्रावर करतात. याची दखल घेत एक वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन मंडळातून नागरी सुविधेंतर्गत तीन लाख रुपये खर्चून नदीपात्रालवर गावाच्या मध्यभागी घाट बांधण्यात आला.

नदीपात्राला जलपर्णीसह झुडपांचा विळखा
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत) : येथील गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नदीपात्रावर वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्चून घाट बांधण्यात आला. मात्र, सध्या नदीपात्राला जलपर्णीसह झाडा-झुडपांनी वेढले असून सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. साफसफाई करण्याकडे मात्र, कुणाचेही लक्ष नसल्याने नागरिकांत रोषाचे वातावरण आहे. घाट परिसराची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
श्रावण महिन्यापासून हिंदू धर्मियांचे धार्मिक सण व्रत वैकल्याला सुरुवात होते. गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नदीपात्रात गावातील महिला हरितालीकेला गौरी पूजन तसेच विसर्जन करतात. तसेच नागरिकही घरगुती गणपतीचे विसर्जन व धार्मिक विधी या नदीपात्रावर करतात. याची दखल घेत एक वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन मंडळातून नागरी सुविधेंतर्गत तीन लाख रुपये खर्चून नदीपात्रालवर गावाच्या मध्यभागी घाट बांधण्यात आला. विविध धार्मिक कार्य या घाटावर करता येणार असल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. मात्र, सध्याची स्थिती बघता अर्धे नदीपात्र गाळाने बुजले आहे. नदीपात्राला जलपर्णी आणि झुडपांनी वेढले आहे. सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे नदीघाटावर पाय ठेवण्यासही कुणी तयार नाही. लाखो रुपये र्खचून बांधलेल्या घाटावर कोणतेच धार्मिक विधी तसेच गणपती विसर्जन करता येत नसल्याने गावातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
ग्रा.पं.चे दुर्लक्ष कारणीभूत
मागील अनेक वर्षांपासून नदीपात्राची स्वच्छता करण्यात आलेली नाही. तसेच बुजलेल्या पात्रातील गाळही काढण्यात आला नाही. मागीलवर्षी घाटाचे बांधकाम करण्यात आले. मात्र, येथील स्वच्छतेची जबाबदारी कुणाची, हे समजायला मार्ग नाही. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षानेच नदीघाटाची ही अवस्था झाली असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.