शोभना नारायणच्या कत्थक नृत्याने श्रोते मुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2015 02:10 IST2015-07-19T02:10:04+5:302015-07-19T02:10:04+5:30
विश्वप्रसिद्ध नृत्यांगना पद्मश्री शोभना नारायण यांच्या कत्थक नृत्याच्या सादरीकरणाने शुक्रवारी वर्धेकर श्रोत्यांना मुग्ध केले.

शोभना नारायणच्या कत्थक नृत्याने श्रोते मुग्ध
वर्धेकरांच्या मनाचा घेतला ठाव : महाभारत आणि यशोधरा प्रसंगाची जिवंत प्रस्तुती
वर्धा : विश्वप्रसिद्ध नृत्यांगना पद्मश्री शोभना नारायण यांच्या कत्थक नृत्याच्या सादरीकरणाने शुक्रवारी वर्धेकर श्रोत्यांना मुग्ध केले. शोभना नारायण यांचा वर्धेत हा पहिलाच कार्यक्रम होता. त्यांनी आपल्या सादरीकरणातून महाभारतातील द्रौपदीचे वस्त्रहरण, कर्ण कुंंती आणि मैथिली शरण गुप्ता यांच्या यशोधरा या कथेतील पात्र हुबेहूब उभे करत श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला.
स्थानिक दत्ता मेघे सभागृहात हे आयोजन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विश्वविद्यालय, वर्धा आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले. जवळपास दोन तास त्यांनी रसिकांना खिळवून ठेवत अनेक कत्थक नृत्याच्या माध्यमातून अनेक प्रसंगी सादर केले.
शोभना नारायण यांचे स्वागत करताना हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. गिरीश्वर मिश्र म्हणाले की, शोभना यांचे नृत्य भारतीयतेची ओळख आहे. आकर्षक प्रकाश व्यवस्था आणि सुमधूर संगतीची साथ यांच्या संगमातून त्यांनी द्रौपदी आणि कुंती सारखे महाभारतातील प्रसिद्ध पात्र तसेच यशोधरा हे पात्र मंचावर हुबेहुब उभे केले.
वर्धेतील रसिकांची साद आणि दाद पाहून त्या म्हणाल्या की, येथे मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने मी खूप खूश झाले. वर्धेत पुन्हा येण्याची मनषा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रो. गिरीश्वर मिश्र, प्रो. चित्तरंजन मिश्र, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे निदेशक पीयूष गोयल, दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विश्वविद्यालयाचे उदय मेघे, मुख्य समन्वयक एस.एस. पटेल, शेतकरी नेते विजय जावंधिया, प्रा. सुरेश शर्मा यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुरेश शर्मा यांनी केले तर आभार प्रकुलगुरू प्रा. चित्तरंजन मिश्र यांनी मानले. कार्यक्रमाला वर्धेकर गणमान्य नागरिक, कला प्रेमी, रसिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)