सेवाग्राम एक्स्प्रेसमधून अट्टल चोरटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:42 IST2017-09-18T23:42:08+5:302017-09-18T23:42:28+5:30

लोहमार्ग पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमधून संशयास्पद हालचाली करीत असल्याने ताब्यात घेतले.

Seventeen thieves seized from Sevagram Express | सेवाग्राम एक्स्प्रेसमधून अट्टल चोरटे जेरबंद

सेवाग्राम एक्स्प्रेसमधून अट्टल चोरटे जेरबंद

ठळक मुद्देदोन्ही चोर मध्यप्रदेशातील : दोन महागडे मोबाईल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोहमार्ग पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमधून संशयास्पद हालचाली करीत असल्याने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोन महागड्या मोबाईलसह एक बॅग आढळली. योग्य उत्तरे न दिल्याने तो मुद्देमाल जप्त कण्यात आला. सत्यम नरेंद्रसिंग ठाकूर (राजपूत) व दिलीप दशरथसिंग गौतम (ठाकूर) दोन्ही रा. जि. सिद्धी मध्यप्रदेश अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.
हिंदनगर येथील भूषण रमेश कोहाड हा मुंबई ते वर्धा सेवाग्राम एक्स्प्रेसने प्रवास करीत असताना रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्याची बॅग पळविली. सदर प्रकार पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्याच्या लक्षात येताच त्याने घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी बॅगचा शोध घेतला असता बॅग सेवाग्राम एक्स्प्रेसमधील एस ९ क्रमांकाच्या डब्ब्यात आढळून आली. याच डब्यात दोन तरुण संशयास्पद स्थितीत दिसून आले. त्यांना ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखविताच गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून बॅग व दोन मोबाईल जप्त केले. ही कारवाई वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस.पी. डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गनोरकर, गजू टाले, विजय मुंजेवार, सविता मेश्राम, कैलास भांडारकर, राहुल येवले, नितीन शेंडे यांनी केली.
घरफोड्यांचेही गुन्हे
सदर चोरट्यांनी एक मोबाईल पुणे येथून तर दुसरा महागडा मोबाईल पनवेल येथून लंपास केल्याची कबुली वर्धा लोहमार्ग पोलिसांना दिली आहे. अटकेत असलेले दोन्ही आरोपी छिंदवाडा येथील अट्टल चोरटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या विरुद्ध मध्यप्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Seventeen thieves seized from Sevagram Express