प्रवाशांच्या सेवेसाठी ‘ब्रीद’चा विसर

By Admin | Updated: August 30, 2014 23:59 IST2014-08-30T23:59:27+5:302014-08-30T23:59:27+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक बसवरील मोनोवर ‘प्रवाशांच्या सेवेत’ हे गोंडस ब्रीदवाक्य लिहून ठेवले आहे; पण खरोखरच परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी आहे काय,

For the services of passengers, forget about Breath | प्रवाशांच्या सेवेसाठी ‘ब्रीद’चा विसर

प्रवाशांच्या सेवेसाठी ‘ब्रीद’चा विसर

पुलगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक बसवरील मोनोवर ‘प्रवाशांच्या सेवेत’ हे गोंडस ब्रीदवाक्य लिहून ठेवले आहे; पण खरोखरच परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी आहे काय, असा सवाल संतप्त प्रवासी उपस्थित करीत आहेत़ गत दहा वर्षांत प्रवास भाडेवाढ, भंगार अवस्थेतील बसेस, अनियमितता, हात दाखवा बस थांबवाला हरताळ, विनंती थांब्यावर बस न थांबविणे आदी प्रकारामुळे प्रवाशांमध्ये असंतोष पसरला आहे़
राज्य परिवहन मंडळाची स्थापना होऊन जवळपास ६ दशके होत आहेत़ या सहा दशकांत आणि आजही आरामदायी व सुरक्षित प्रवासाकरिता प्रवाशी परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना प्राधान्य देतात़ मध्यंतरी खासगी प्रवासी वाहनांमध्ये अनेक प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्याने व आकर्षक आरामदायी गाड्यांमुळे प्रवासी खासगी बसकडे आकर्षित झाले होते़ यामुळे परिवहन महामंडळ आर्थिक डबघाईस आले; पण परिवहन मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षात संगीतमय व मनोरंजनात्मक प्रवासासाठी अनेक बसमध्ये स्टिरिओ व व्हीडिओ सेवा सुरू करून प्रवाशांचे लक्ष वेधले़ स्थानिक आगारानेही पुलगाव ते अंजनगाव (सुर्जी) ही व्हीडीओकोच सेवा सुरू केली होती; पण काही महिन्यांतच या योजनेचा फज्जा उडाला़ पुढे प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वागणूक ठेवून प्रवासी जोडो अभियान, सुरक्षा सप्ताह, हात दाखवा बस थांबवा, अलिकडेच सौजन्यपूर्ण वागणुकीसाठी चालक व वाहकांनी बसच्या गेटवर प्रवाशांचे हसतमुखाने स्वागत करावे, असे अनेक उपक्रम प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सुरू करण्यात आलेत; पण अनेक चालक, वाहक या उपक्रमांना बगल देत असल्याचे दिसून येते़
गत १० वर्षांमध्ये परिवहन महामंडळाने प्रवाशी भाड्यात जवळपास दुपटीने वाढ केली आहे़ वास्तविक, भाडेवाढ करणे गरजेचे आहे; पण त्याच्या तुलनेत योग्य सेवा देणेही तेवढेच गरजेचे आहे़ सध्या असलेल्या भंगार गाड्या, चालक, वाहकांची प्रवाशांशी वागण्याची पद्धत, वेळापत्रकानुसार न चालणाऱ्या गाड्या, सुट्या पैशांसाठी होणारे वाद, बसस्थानकावरील अव्यवस्था आदी बाबी प्रवाशांना क्लेषदायक ठरत आहेत़ प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्याचे सार्थक करायचे असेल व परिवहन महामंडळाला भरभराटीचे दिवस आणायचे असतील तर परिवहन महामंडळाने या बाबींकडे गांर्भीयाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे़ किमान अनियमित सुटणाऱ्या बसेसही तालावर आणल्या तरी प्रवाशांना हायसे होणार आहे़(तालुका प्रतिनिधी)

Web Title: For the services of passengers, forget about Breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.