मोहता हायस्कूलच्या वास्तूशी भावनिक बंधहेमंत चंदनखेडे। लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शिक्षण कार्यात १३७ वर्षांचे योगदान असणारी येथील गं.बु. मोहता विद्यालयाची ब्रिटीशकालीन वास्तू आता पडद्याआड जाणार आहे. त्या ठिकाणी नवीन वास्तू उभारली जात आहे. ती ब्रिटीशकालीन व ब्रिटीश वास्तूकलेनुसार उभारलेली इमारत पाडायला सुरुवात झाली आहे. या शाळेशी अनेक आजी-माजी विद्यार्थ्यांचे १३७ वर्षांपासून भावनिक बंध तयार झाले आहे. यामुळे ही घटना अनेकांना चटका लावणारी ठरत आहे. ती इमारत जीवन पटलावरून अदृष्य होणार असल्याची खंत व्यक्त होत आहे. ती वास्तू जीर्ण झाल्याने नवीन इमारत बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला. यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील पुरातन शाळांत ही शाळा प्रथम क्रमांकावर आहे. १८८० मध्ये वर्धा व हिंगणघाटला सर्वप्रथम शाळा उघडण्यात आल्या. यातील ही तालुक्यातील पहिली शाळा होती. शाळेचे पूर्वीचे नाव ‘रॉबर्टसन हायस्कूल’ होते. पुढे शं.बु. मोहता विद्यालय झाले. या शाळेने लौकिक करीत विद्यार्थ्यांच्या जीवनास आकार देण्याचे कार्य केले. येथील माजी विद्यार्थी देश-विदेशात आंतरराष्ट्रीय स्तरावर तज्ज्ञ, संशोधक झालेत. भावनिक बंधामुळे शाळा पडताना पाहणे अस्वस्थ करणारे ठरत आहे; पण काळानुरूप बदल गरजेचा आहे. १८५४ मध्ये हा प्रदेश ब्रिटीशांकडे आल्यानंतर पाश्चिमात्य शिक्षणास प्रारंभ झाला. १८८२ मध्ये लॉर्ड रिपनने प्राथ., उच्च प्राथ. शिक्षणाची जबाबदारी स्थानिक संस्थांकडे सोपविली. त्या काळी आर्वी, वर्धा, हिंगणघाट ही शैक्षणिक केंद्रे होती. अँग्लो व्हर्नानुसार शाळांना हायस्कूलचा दर्जा देण्यात आला. या शाळेला प्रदीर्घ इतिहास असून वास्तूला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.प्रस्तावित इमारतमोहता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची इमारत जमीन, पहिला व दुसरा माळ्याचे बांधकामाचा अंदाजपत्रकीय खर्च ८ कोटी १५ लाख आहे. न.प. च्या वैशिष्ट्यपूर्ण योजना २०१३-१४ व १५-१६ मधून हे विकास कार्य होत आहे.