सातगावची निवडणूक होणार रंगतदार
By Admin | Updated: July 23, 2015 01:50 IST2015-07-23T01:50:37+5:302015-07-23T01:50:37+5:30
सालेकसा तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी सातगाव (साखरीटोला) ग्रामपंचायतची निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सातगावची निवडणूक होणार रंगतदार
सभासदांच्या नऊ जागा : २१ उमेदवार रिंगणात
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी सातगाव (साखरीटोला) ग्रामपंचायतची निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नऊ सभासदांसाठी तीन वार्डातून एकूण २१ उमेदवार रिंगणात असून साम, दाम, दंड या तिन्ही साधनांचा वापर करून विजयश्री खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जि.प. व पं.स.च्या निवडणुकीत जि.प.चे अध्यक्ष पद व पं.स.चे सभापती पद या गावाला मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात साखरीटोल्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आता येत्या २५ जुलैला ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत. ग्रा.पं. निवडणूक गावात तणावाचे वातावरण निर्माण करते. ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जातात. त्यामुळे ग्रामपंचायत आर्थिक स्त्रोत मिळवून देण्याचे माध्यम झाल्याने अनेकांच्या नजरा वळल्या आहेत.
सध्या ग्रामपंचायत सातगावच्या निवडणुकीत पक्षविरहीतपणा असला तरी आपापल्या परीने वेगवेगळे पॅनल तयार करून पॅनलच्या झेंड्याखाली निवडणूक लढविली जात आहे. प्रत्येक पॅनलने काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली असून जुन्या अनुभवी चेहऱ्यांनासुध्दा उमेदवारी दिली आहे. साखरीटोला व सातगाव या दोन्ही गावे मिळून ग्रामपंचायत असून साखरीटोला वार्ड- १ मधून सहा उमेदवार, वार्ड- २ मधून नऊ उमेदवार, तर वार्ड- ३ (सातगाव) येथून सहा उमेदवार रिंगणात आहेत. सरपंच पद अ.जा. (महिला) प्रवर्गाकरिता आरक्षित आहे. रिंगणात अ.जा.च्या तीन महिला वेगवेगळ्या पॅनलच्या झेंड्याखाली रिंगणात असल्याने अधिक रंगत वाढली आहे. साखरीटोला येथे जात फॅक्टर मोठ्या प्रमाणात काम करण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षातील विकास व पुढे गावाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणाऱ्या क्षमतावान लोकांना कितपत लोक पसंती देतात, हे लवकरच कळेल.