वर्धा जिल्ह्यतील ब्रिटिशकालीन सारंगपुरी जलाशय विकासाच्या प्रवाहातून लांबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 08:33 PM2020-08-24T20:33:07+5:302020-08-24T20:35:14+5:30

वर्धा जिल्ह्यतील आर्वी तालुक्याची ओळख असलेल्या या जलाशयाकडे स्वातंत्र्योत्तर काळानंतरही शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने हा जलाशय विकासापासून कोसो दूर राहिला आहे.

Sarangpuri reservoir in Wardha district is far from the stream of development | वर्धा जिल्ह्यतील ब्रिटिशकालीन सारंगपुरी जलाशय विकासाच्या प्रवाहातून लांबच

वर्धा जिल्ह्यतील ब्रिटिशकालीन सारंगपुरी जलाशय विकासाच्या प्रवाहातून लांबच

googlenewsNext
ठळक मुद्देगिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदपर्यटन विकासाचे घोडे अडलेय कुठे, नागरिकांचा प्रश्न

राजेश सोळंकी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ब्रिटिशांनी दूरदृष्टी ठेवूनच विकासकामे केली होती. त्यांनी बांधलेले पूल, इमारती आणि जलाशय आजही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. इंग्रजांनी १९१७ मध्ये अभ्यास करून आर्वीमध्ये सारंगपुरी जलाशयाची निर्मिती केली. त्या काळामध्ये या जलाशयाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. आर्वी तालुक्याची ओळख असलेल्या या जलाशयाकडे स्वातंत्र्योत्तर काळानंतरही शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने हा जलाशय विकासापासून कोसो दूर राहिला आहे. या जलाशयाचा पर्यटनासाठी विकास करण्याची कित्येक वर्षांपासूनची मागणी असतानाही घोडे अडेलय कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आर्वीकरांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी ब्रिटिश राजवटीत १९१७ मध्ये सारंगपुरी जलाशयाची निर्मिती करण्यात आली. तब्बल ८५ वर्षे हा जलाशय आर्वीकरांसाठी जीवनदायिनी ठरला होता. इंग्रजांच्या राजवटीत या तलावाचे पाणी कोणतेही यंत्र न वापरता सरळ तिसऱ्या माळ्यावर पोहोचत होते. याचीच दखल घेऊन या जलाशयाची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. आर्वीची वाढती लोकसंख्या तसेच जलाशयातील गाळ न उपसल्याने येथील पाणीपुरवठा अपुरा ठरत होता. त्यामुळे नगरपालिकेने ही नळयोजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला हस्तांतरित केली. आता पंधरा ते वीस वर्षांपासून जीवन प्राधिकरणच्या नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या जलाशयाकडे प्रशासनासह शासनाचे दुर्लक्ष असल्याने या जलाशयाची दुर्दशा झाली आहे.

आर्वीकरांसाठी हा ऐतिहासिक ठेवा कायम राहावा म्हणून हे पर्यटनस्थळ व्हावे, यासाठी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक यांच्या सहकार्याने शासनाला प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली. मोठ्या थाटामाटात उद्घाटन करून बांधकाम विभागाने काही बांधकामही केले. मात्र, अनेक महिन्यांपासून काम थंडबस्त्यात पडले असून जलाशयाची दुरवस्था झाली आहे. या जलाशयावर जाण्यासाठी इंग्रजांनी दगडाच्या पायऱ्या केल्या होत्या, त्याही दिसेनाशा झाल्या आहेत. भिंतीही कमजोर झाल्या असून त्याला तारांच्या जाळ्या लावण्यात आल्या आहेत. जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून झाडे-झुडपेही वाढली आहेत. या परिसरात जवळपास दीडशे एकरमध्ये सागाची झाडे असून ही जमीन नगरपालिकेच्या मालकीची आहे. याकडे अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष असल्याने हे पर्यटनस्थळ केव्हा होणार?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आर्वी नगरपालिकेने सारंगपुरी जलाशय पर्यटनस्थळ व्हावे यासाठी प्रस्ताव पाठविला होता. तो प्रस्ताव शासनाने मंजूर केला, शासनाचा तो निधी बांधकाम विभागाला हस्तांतरित केला. त्याचे कामही सुरू आहे. मात्र, आता जलदगतीने आणि चांगले काम करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. आराखड्याप्रमाणे ते काम ठरलेल्या कालावधीत पूर्ण करून बांधकाम विभाग नगरपालिकेकडे हस्तांतरित करणार आहे. त्यानंतर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नगरपालिकेकडे राहील.
- प्रा. प्रशांत सव्वालाखे, नगराध्यक्ष, आर्वी

Web Title: Sarangpuri reservoir in Wardha district is far from the stream of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी