रेती चोरीची धग; माफियांमध्येच संघर्ष
By Admin | Updated: February 26, 2015 01:21 IST2015-02-26T01:18:28+5:302015-02-26T01:21:46+5:30
रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे़ अद्याप आष्टी व आर्वी तालुक्यातील काही घाटांचे लिलाव झालेले नाहीत; पण सदर घाटांवरून रेतीचा अवैध उपसा अव्याहत सुरू आहे़ ...

रेती चोरीची धग; माफियांमध्येच संघर्ष
वर्धा : रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे़ अद्याप आष्टी व आर्वी तालुक्यातील काही घाटांचे लिलाव झालेले नाहीत; पण सदर घाटांवरून रेतीचा अवैध उपसा अव्याहत सुरू आहे़ यात काहींवर कारवाईचा बडगा उगारला जातो तर काही बिनधोकपणे चोरीची रेती विकत आहे़ यामुळे रेती माफीयांच्या दोन गटांतच संघर्षाची ठिणगी पडली आहे़ रविवारी झालेली हाणामारीही त्यातलाच प्रकार आहे़ पोलीस व महसूल प्रशासनाने ही बाब गांभीर्याने न घेतल्यास संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे़
वर्धा जिल्ह्यात १५७ रेतीघाट आहेत़ यातील ३५ घाटांच्या लिलावाचे नियोजन होते़ यातील काही घाटांचे लिलाव झाले असून अधिक किमतीमुळे अनेक घाट कुणीच घेतले नाहीत़ असे असले तरी सदर घाटांतून रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याचे समोर आले आहे़ जिल्ह्यात रेतीची सर्रास चोरी होत असून महसूल आणि पोलीस प्रशासन गप्पच असल्याचे दिसते़ कधीकाळी एखादी कारवाई करून रेती चोरीकडे लक्ष असल्याचा भास निर्माण केला जातो़ या कारवाईचे गुपितही आता उघड होऊ लागले आहे़ घाटधारक वा ट्रॅक्टरचे चालक-मालक अशा तक्रारी करून आपली रेती बाजारात अधिक किमतीत विकली जावी, यासाठी हे राजकारण करीत असल्याचे काल-परवाच्या घटनेवरून उघड झाले़ याबाबत पोलिसांत तक्रार होत असताना दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसते़ शिवाय महसूल प्रशासन आणि खनिकर्म अधिकारीही डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे़ देवळी व आर्वी तालुक्यात हा प्रकार सर्वाधिक असून रेतीमाफीयांत फुट दिसून येत आहे़ चोरीच्या रेतीवरून हा प्रकार घडत असल्याचेही समोर आले आहे़
देवळी तालुक्यातील एकाच घाटाचा लिलाव झाला होता़ यामुळे पुलगाव येथील रेती माफीयांनी यवतमाळ जिल्ह्यातील घाट खरेदी केले़ त्यांनी त्यांच्या घाटातील रेती काढणे अपेक्षित असताना वर्धा जिल्ह्यातील घाटातून रेती काढून यवतमाळ, अमरावती येथे विकण्यास सुरूवात केली आहे़ घाटासाठी मोजलेली किंमत कुठल्याही स्थितीत वसूल करण्यासाठी हे प्रताप केले जात असून ते रोखण्याची गरज निर्माण झाली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
- रोहणा - चोरीची रेती स्वस्त दरात विकतो, असा संशय आल्याने रोहणा येथे ट्रॅक्टरद्वारे आणलेली रेती चोरीची असल्याची तक्रार तहसीलदार आर्वी यांना करण्यात आली़ सदर रेती जप्त करण्याची मागणी त्याच व्यवसायात असलेल्यांनी केली़ यावरून ट्रॅक्टरवरील मजूर व तक्रारकर्त्यांत हाणामारी झाली़ हे प्रकरण पोलिसात पोहोचले़ यानंतर सदर रेती चोरीची की मालकी ठिय्यावरील, याची चौकशी तहसीलदार आर्वी यांनी सुरू केली आहे़
- रेती कंत्राटदार गजानन निकम हे लिलाव झालेल्या व न झालेल्या घाटातील रेती काढून ग्राहकांना स्वस्तात रेती विकतात़ यामुळे आपला धंदा मार खातो, असा समज झाल्याने निकम यांनी ग्राहकाकडे पाठविलेले रेतीचे ट्रॅक्टर रोहणा बस स्थानकावर धवन टाकळे व प्रीनल कदम यांनी अडविले़ यावेळी ट्रॅक्टर चालकाशी वाद घातला़ शिवाय आम्ही चोरीची रेती पकडली आहे, त्वरित घटनास्थळावर येऊन कारवाई करा, अशी मागणी भ्रमणध्वनीद्वारे आर्वीचे तसहीलदार मनोहर चव्हाण यांच्याकडे करण्यात आली़
- दरम्यान, सायखेडा येथील घाटावर घाट निरीक्षणासाठी तहसीलदार मनोहर चव्हाण, मंडळ अधिकारी काळुसे व तलाठी उरकुडे आले होते़ सोबत काही रेती कंत्राटदारही होते. ट्रॅक्टर पकडल्याची तक्रार प्राप्त होताच महसूल विभागातील सदर अधिकारी व काही रेती विक्रेते घटनास्थळी दाखल झाले़ ट्रॅक्टर चालकाने रेती मालक गजानन निकम यांना कळविल्याने ते देखील घटनास्थळी पोहोचले़ निकम यांनी सदर रेती चोरीची नसून ठिय्यावरील आहे आणि रॉयल्टी भरलेली आहे, असे सांगितले़
- संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी तहसीलदार चव्हाण यांनी चालकाला ट्रॅक्टर ठिय्यावर घेण्यास सांगितले. चालकाने ट्रॅक्टर ठिय्याकडे नेले़ अधिकारी, रेती व्यवसायात असलेले इतर ठेकेदार आणि तक्रारकर्ते हे सर्व आपापल्या वाहनांनी तेथे पोहोचले; पण ट्रॅक्टर पोहोचले नाही़ मधेच ट्रॅक्टरचा टायर फुटण्याचा प्रकार घडला़
- असे असले तरी अधिकाऱ्यांनी ठिय्याचे निरीक्षण केले़ ट्रॅक्टर चालक आणि रेतीमालकाचे बयाण नोंदवून घेत प्रकरण कारवाईसाठी तयार केले़
- ही कार्यवाही आटोपून अधिकारी परत आर्वीला जाण्यासाठी निघाल्यानंतर तक्रारकर्ते व ट्रॅक्टरवरील मजूर यांच्यात पुन्हा वाद झाला़ त्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले़ यात तक्रारकर्त्यांना किरकोळ मार लागल्याने सदर प्रकरण पुलगाव पोलिसांत गेल्याचेही समजते.(वार्ताहर)
वाद विकोपाला जाण्याची शक्यता
- याबाबत तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता़
- मंडळ अधिकारी काळुसे यांनी सदर प्रकरणात कारवाई केल्याचे मात्र महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले़
- याच प्रकरणामध्ये दिघी येथे घडलेल्या हाणामारीबाबत आर्वी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़
- सदर प्रकरण एक ट्रॅक्टर रेतीचेच असले तरी रेती विक्रेत्यांमधील अंतर्गत संघर्षाची ही ठिणगी आहे़ हा संघर्ष कधीही विकोपाला जाऊ शकतो़ यामुळे महसूल विभागाचे अधिकारी व पोलीस यंत्रणनेने थातूर-मातूर चौकशी न करता दोषींवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे़
अधिकारी ‘नॉट रिचेबल’
- याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी राजन पाली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता़
- शिवाय उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांचा भ्रमणध्वनीही उत्तर देत नव्हता़
- संबंधित अधिकारी नॉट रिचेबल असल्याने या प्रकरणात काय भूमिका घेणार, हे कळू शकले नाही़