वाळू माफियांनी तोडले कोल्हापूर मार्गावरील बॅरिगेट्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST2021-02-20T05:00:00+5:302021-02-20T05:00:17+5:30
वर्धा नदीच्या पात्रात अवैध उत्खनन करून काही वाळू माफिया सध्या वाळूची चोरी करीत आहेत. त्यांना राजकीय पुढाऱ्यांकडून पाठिशी घातल्या जात असल्याने वाळू माफियांची हिम्मतही वाढली आहे. काही वाहन चालक वर्धा-यवतमाळ मार्गावरील टोल वाचविण्यासाठी याच चोर मार्गाचा वापर करतात. तर याच चोर रस्त्याने सध्या काही वाळू माफिया दिवसाला व रात्रीला वाळूची वाहतूक करतात.

वाळू माफियांनी तोडले कोल्हापूर मार्गावरील बॅरिगेट्स
लोकमत न्यूज नेटवर्क
भिडी : अवैध उत्खनन करून वाळूची चोरी आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत. परंतु, पोलीस आणि महसूल विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे देवळी तालुक्यात वाळूमाफियांच्या मनमर्जीला ऊत आले आहे. अवजड वाहनांची ये-जा होऊ नये म्हणून कोल्हापूर (राव) मार्गावरील बॅरिगेट्स बसविण्यात आले होते. परंतु, हेच बॅरिगेट्स काही वाळू माफियांनी तोडल्याने ‘शासकीय अधिकाऱ्यांपेक्षा वाळू माफियांचे पारडे जड काय’ अशी चर्चा सध्या परिसरात होत आहे.
वर्धा नदीच्या पात्रात अवैध उत्खनन करून काही वाळू माफिया सध्या वाळूची चोरी करीत आहेत. त्यांना राजकीय पुढाऱ्यांकडून पाठिशी घातल्या जात असल्याने वाळू माफियांची हिम्मतही वाढली आहे. काही वाहन चालक वर्धा-यवतमाळ मार्गावरील टोल वाचविण्यासाठी याच चोर मार्गाचा वापर करतात. तर याच चोर रस्त्याने सध्या काही वाळू माफिया दिवसाला व रात्रीला वाळूची वाहतूक करतात. अवजड वाहनांची या मार्गाने ये-जा होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कोल्हापूर (राव) मार्गावर लोखंडी पोल बसविण्यात आले होते. पण हेच बॅरिगेट्स वाळू माफियांनी तोडल्याने बॅरिगेट्सवर खर्च झालेला शासकीय निधी वाया गेला आहे. या बॅरिगेट्सची वेळीच दुरूस्ती करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांची आहे.
रोहणी, तांबा शिवारातून आणली जाते वाळू
वाळू माफियांनी रोहणी तसेच तांबा शिवारात आपले पाय मजबुत केले आहे. याच ठिकाणी सध्या बोट, पोकलँड आणि जेसीबीच्या सहाय्याने नदी पात्रात उत्खनन करून वाळूची चोरी केली जात आहे. वाळू माफिया इतक्यावरच थांबलेले नसून त्यांच्याकडून चोरीच्या वाळूची वाहतूक तोडलेल्या बॅरिगेट्च्या मार्गाचा वापर करून केला जात आहे. असे असतानाही देवळीचे तालुका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
सीसीटीव्ही चुकविण्यासाठी खटाटोप
वर्धा-यवतमाळ मार्गावरील टोल नाक्यावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. याच सीसीटीव्हीत वाळू भरलेल्या वाहनांचे चित्रिकरण होऊ नये म्हणून वाळू माफिया आपली वाळू भरलेली वाहने कोल्हापूर (राव) मार्गाने नियोजित ठिकाणी नेत असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूर (राव) मार्गावरील तोडलेले बॅरिगेट्स दुरूस्त करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविल्यास वाळू माफियांचे पितळ उघडे पडेल, हे तितकेच खरे.