दोन एकर संत्रा बागेतून ‘सागर’ने घेतले १० लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 05:00 AM2022-04-28T05:00:00+5:302022-04-28T05:00:16+5:30

सन २०१५मध्ये शासकीय राष्ट्रीय बाग - वानी बोर्डाचे संचालक पनवार यांच्या मार्गदर्शनात सागरने २० एकर शेतीपैकी १२ एकरमध्ये २००० संत्रा फळझाडांची लागवड केली. यापैकी २ एकर जमिनीत इस्त्राईल  तंत्रज्ञान पद्धतीने संत्रा लावला. ३ एकरांत काकडी, टोमॅटो, भेंडी व फुलशेती सुरू केली. काकडी, टोमॅटो व फुलशेतीतून लाखो रुपयांचे तो उत्पादन घेत आहे.  २ एकरात इस्त्राईल पद्धतीने लावलेल्या संत्रा बागेतून यावर्षी त्याने  १० लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.

Sagar earned Rs 10 lakh from a two acre orange orchard | दोन एकर संत्रा बागेतून ‘सागर’ने घेतले १० लाखांचे उत्पन्न

दोन एकर संत्रा बागेतून ‘सागर’ने घेतले १० लाखांचे उत्पन्न

googlenewsNext

अरूण फाळके
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घाडगे) : जिद्द, प्रयत्न आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर युवा शेतकऱ्याने प्रतिकूल परिस्थितीतही उत्कृष्ट व प्रगतशिल शेतकरी म्हणून वाटचाल सुरु केली आहे. त्याची ही वाटचाल इतर शेतकऱ्यांसाठी मात्र, प्रेरणादायी ठरत असल्याचे चित्र आहे. आदिवासीबहुल जोगा गावातील सुशिक्षित युवा शेतकरी सागर गजानन पुरी (३२) याने दोन एकर संत्रा बागेतून यावर्षी तब्बल १० लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. 
सागरचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले असून, त्याच्याकडे वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. तो एखाद्या शाळेत किंवा सहकारी बँकेत लिपिकाची नोकरी करू शकला असता. पण, त्याने नोकरी न करता वडिलोपार्जित शेती, पारंपरिक पद्धतीला बगल देऊन आधुनिक पद्धतीने शेती करून अर्थार्जनाचे मुख्य साधन बनवायचे, असा ध्यास घेतला आणि वयाच्या अवघ्या २५व्या वर्षापासूनच पुढील वाटचाल सुरु केली. 
सन २०१५मध्ये शासकीय राष्ट्रीय बाग - वानी बोर्डाचे संचालक पनवार यांच्या मार्गदर्शनात सागरने २० एकर शेतीपैकी १२ एकरमध्ये २००० संत्रा फळझाडांची लागवड केली. यापैकी २ एकर जमिनीत इस्त्राईल  तंत्रज्ञान पद्धतीने संत्रा लावला. ३ एकरांत काकडी, टोमॅटो, भेंडी व फुलशेती सुरू केली. काकडी, टोमॅटो व फुलशेतीतून लाखो रुपयांचे तो उत्पादन घेत आहे.  २ एकरात इस्त्राईल पद्धतीने लावलेल्या संत्रा बागेतून यावर्षी त्याने  १० लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. अत्यंत मेहनतीने व आधुनिक पद्धतीने शेती करून उच्च उत्पादन करण्याचा सागरचा मानस आहे. अर्थात शेती करताना खंडित विद्युत पुरवठा, मजुरांची कमी, शेतमालाला मिळत असलेला कमी भाव आणि बाजार पेठेची उणीव भासते, अशी खंत सागरने यावेळी व्यक्त केली.  

रासायनिक खताला दिली बगल
रासायनिक खतांचा वापर टाळून सागरने कंपोस्ट खत, जैविक खत, शेणखत आणि गांडूळ खतांचा जास्त प्रमाणात वापर केला. पारंपरिक सिंचन पद्धतीला बगल देऊन ठिबक, तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब त्याने केला. आजघडीला त्याच्याजवळ शेतमशागतीसाठी रोटावेटर, बी. बी. एफ. व स्प्रेइंग युनिट पेरणीयंत्र, नांगरणीचा अद्ययावत ट्रॅक्टर आदी आधुनिक साधने असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगतशील शेती तो करीत आहे.

इस्त्राईल शेती दौऱ्यातून घेतली माहिती 
आधुनिक शेती तंत्रज्ञान माहिती होण्यासाठी सागरने शासनाच्या कृषी विभागातर्फे फेब्रुवारी २०१९मध्ये आयोजित इस्त्राईल शेती दौऱ्यात प्रत्यक्ष सहभागी होत सखोल माहिती घेतली. बारामती येथे आयोजित केलेल्या कृषी विज्ञान शिबिरात भाग घेतला. कारंजा तालुका कृषी विभागाचे सागर नेहमीच मार्गदर्शन घेतो. वर्धा जिल्हा ॲग्रोप्रोड्युसर संघटनेचा सागर क्रियाशील सभासद असून, तो करीत असलेली आधुनिक व प्रगतशील शेती पाहण्यासाठी कारंजा तालुक्यातील आणि वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी गर्दी करतात.

 

Web Title: Sagar earned Rs 10 lakh from a two acre orange orchard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती