रशिया,युकेच्या टपाल पार्सल सेवेला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:00 IST2020-12-28T05:00:00+5:302020-12-28T05:00:27+5:30
एप्रिलमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने विभागाकडून पार्सल सेवा थांबविण्यात आली होती. त्यानंतर ब्रिटनमध्ये नवीन विषाणू आढळल्याने डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने टपाल विभागानेही रशिया आणि युकेची टपाल सेवा थांबविण्याची ही दुसरी वेळ आहे.

रशिया,युकेच्या टपाल पार्सल सेवेला ‘ब्रेक’
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून काही देशांची आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे. परिणामी, टपाल विभागाकडून रशिया आणि युकेची टपाल पार्सलसेवा थांबविण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही सेवा बंद राहणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
मार्च महिन्यामध्ये जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता. अनेक देशांनी त्यांची आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली होती. संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली.
ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन स्ट्रेनमुळे पुन्हा तीच परिस्थिती उद्धवली आहे. केंद्र सरकारने रशिया आणि युकेची आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवरच नाही तर सर्व प्रकारच्या आयात निर्यातीवरही झाला आहे.
बुधवारी टपाल विभागाच्या केंद्रीय कार्यालयाकडून रशिया आणि युके या दोन्ही देशांची पार्सल बुकिंग तत्काळ थांबविण्याच्या सूचनाचे पत्रक मुख्य टपाल कार्यालयास दिले आहे. लगेचच टपाल विभागाकडून रशिया आणि युकेची आंतराष्ट्रीय पार्सल सेवेची बुकिंग बंद केली आहे.
त्यामुळे या देशांची टपाल विभागाची पार्सलसेवा कोलमडली आहे. टपाल विभागाला पार्सलच्या बुकिंगच्या माध्यमातून मिळणारा महसूलही बुडण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती विभागाने दिली आहे.
वर्षात दुसऱ्यांदा सेवा झाली बंद
एप्रिलमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने विभागाकडून पार्सल सेवा थांबविण्यात आली होती. त्यानंतर ब्रिटनमध्ये नवीन विषाणू आढळल्याने डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने टपाल विभागानेही रशिया आणि युकेची टपाल सेवा थांबविण्याची ही दुसरी वेळ आहे.
नागपूर येथून जातात पार्सल
वर्धा शहरात विमानसेवा नसल्याने आंतराष्ट्रीय टपाल पार्सल नागपूर किंवा मुंबई येथील विमानसेवेद्वारा संबंधित देशात पाठविण्यात येत होते. मात्र, ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनमुळे आंतराष्ट्रीय टपाल सेवा बंद करण्यात आल्याने सध्या वर्धा टपाल सेवेद्वारा रशिया आणि युकेच्या टपाल पार्सल सेवा थांबविण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
नुकतेच शासनाचे परिपत्रक प्राप्त झाले असून रशिया आणि युके या दोन देशात जाणाऱ्या टपाल पार्सल सेवा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातून दोन ते तीन टपाल पार्सल या देशात पाठविल्या जात होते. मात्र, ब्रिटनमधील नव्या स्ट्रेन विषाणूमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या रशिया आणि युकेच्या टपाल पार्सल सेवा बंद आहे.
- अविनाश अवचट, पोस्टमास्तर मुख्य डाकघर वर्धा.