ढगाळ वातावरणामुळे धावपळ
By Admin | Updated: October 27, 2014 22:42 IST2014-10-27T22:42:03+5:302014-10-27T22:42:03+5:30
या आठवड्यातील सततच्या ढगाळ वातावरण व रिपरिप पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. कापनी झालेल्या सोयाबीनची गंजी झाकण्यासाठी ताडपत्री व प्लास्टिक खरेदीचा भुर्दंड शेतकऱ्यांना

ढगाळ वातावरणामुळे धावपळ
सोयाबीनची गंजी झाकण्यासाठी ताडपत्री व प्लास्टिक खरेदीचा भुर्दंड
सेलू : या आठवड्यातील सततच्या ढगाळ वातावरण व रिपरिप पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. कापनी झालेल्या सोयाबीनची गंजी झाकण्यासाठी ताडपत्री व प्लास्टिक खरेदीचा भुर्दंड शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात भोगावा लागत आहे. अशात आलेल्या पावसात जर उत्पन्न ओले झाले तर त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवीत आहे. नाममात्र सोयाबीन होण्याची स्थिती आहे. कापलेले सोयाबीन ठिग लावून शेतात ठेवले. मळणीपूर्वीच पावसाची रिपरिप सुरू झाली. सोयाबीन ओले होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी ढीग झाकण्यासाठी आर्थिक सोय नसतांना ताडपत्री व प्लास्टिक खरेदी करून ढीग झाकण्याचा सपाटा लावला आहे.
कापूस शेतात ओला होत आहे. वेचणीसाठी मजुरांची अडचण आहे. कापसाची वेचणी झाल्यावर काही वर्षापूर्वी वेचणाऱ्या महिला डोक्यावर गाठोडे घेऊन यायच्या. आता घरापर्यंत गाठोडे आणण्यासाठी शेतमालकाला चारचाकी वाहन किंवा बैलबंडीची व्यवस्था करावी लागते. एवढा सर्व खर्च केल्यावर शेतकऱ्यांकरिता काही शिल्लक राहील, याचा भरवसा नाही.
निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. दरवर्षी नवीन आशा घेऊन पेरते होणाऱ्या शेतकऱ्यास मळणीच्या वेळेस किंवा शेतमाल विकताना प्रचंड आर्थीक फटका बसतो. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी यामुळे ताळमेळ बसत नाही. शासनाने शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाचे भाव निर्धारीत केले नाही तरी शेतकऱ्याच्या नशीबी त्याच हालअपेष्टा कायम राहणार आहे. ढगाळ वातावरणात जर पाऊस आला तर त्याचा विपरीत परिणाम उत्पन्नावर झाल्याखेरीज राहणार नाही. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.(तालुका प्रतिनिधी)