परवाना काढण्यासाठी आरटीओची दादागिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:35 IST2018-11-29T23:35:11+5:302018-11-29T23:35:35+5:30
उपप्रादेशिक परिवहन विभाग, वर्धा अंतर्गत परवाना काढण्यासाठी आष्टीला कॅम्प आयोजित करतात. पण, अधिकारी अवेळी उपस्थित राहतात. तसेच दलालाच्या माध्यमातून चिरीमिरी घेतल्याशिवाय कामच होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या या दादागिरीमुळे वाहनधारकांना चांगालच त्रास सहन करावा लागत आहे.

परवाना काढण्यासाठी आरटीओची दादागिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : उपप्रादेशिक परिवहन विभाग, वर्धा अंतर्गत परवाना काढण्यासाठी आष्टीला कॅम्प आयोजित करतात. पण, अधिकारी अवेळी उपस्थित राहतात. तसेच दलालाच्या माध्यमातून चिरीमिरी घेतल्याशिवाय कामच होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या या दादागिरीमुळे वाहनधारकांना चांगालच त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत गुरुवारी राज्याच्या परिवहन आयुक्तांनाही लेखी तक्रार करण्यात आली आहे.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दोन दिवस आधी आष्टीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने परवाना काढण्यासाठी कॅम्प आयोजित केल्या जातो. यानुसार २८ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृहात शंभरावर दुचाकीचालक व डझनभर चारचाकी चालक परीक्षा देण्यासाठी जमले होते. यावेळी परिवहन विभागाचे अधिकारी तथा कर्मचारी दुपारी २ वाजता हजर झाले. कमी वेळेत सर्वांना निकाली काढण्यासाठी घाईघाईने प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी आष्टीचे राहुल देशमुख चारचाकी गाडीच्या स्टेअरींगवर बसले. तेव्हा अधिकाºयांनी त्यांना गाडी चालू देण्याऐवजी ‘तुम्ही नापास झाले. माझ्याशी मुजोऱ्या करू नका. पुढच्या वेळी पास करुन देईल.’ अशी उत्तरे देवून वेळ मारुन नेली. येथे दुचाकीच्या परवान्यासाठी एक हजार रुपये तर चारचाकीसाठी दोन ते अडीच हजार रुपये चिरीमिरी घेतात. दिली नाही तर लिंक नसल्याचे कारण सांगून पतरवून लावत असल्याचे सांगण्यात आले.
...तर तुमच्यावर कारवाई करु
वाहनचालकांच्या तक्रारीवरुन प्रतिनिधी तेथे गेले असता उपस्थित अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. तसेच फोटो काढू नका, परवानगी घेतली आहे का. अन्यथा तुमच्यावर कारवाई करु अशी भाषा वापरुन दमदाटी केली. यावरुन या अधिकारी व कर्मचाऱ्यांची किती मुजोरी वाढली हे दिसते.