आईच्या संघर्षमय जीवनाला मुलाने केले ‘रोशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:44 IST2019-03-09T23:43:29+5:302019-03-09T23:44:35+5:30
वडिलांनी अर्ध्यावरच डाव मोडत दुसरा घरठाव केला. त्यामुळे आईवर मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी येऊन पडली. अशा परिस्थितीत आईच्या संघर्षमय जीवनाला ‘रोशन’ करण्यासाठी मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करुन फौजदार पदाला गवसणी घातली आहे.

आईच्या संघर्षमय जीवनाला मुलाने केले ‘रोशन’
फनिंद्र रघाटाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : वडिलांनी अर्ध्यावरच डाव मोडत दुसरा घरठाव केला. त्यामुळे आईवर मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी येऊन पडली. अशा परिस्थितीत आईच्या संघर्षमय जीवनाला ‘रोशन’ करण्यासाठी मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करुन फौजदार पदाला गवसणी घातली आहे.
रोशन उत्तम इरपाचे रा. रोहणा, असे या कर्तृत्ववान मुलाचे नाव आहे. वडीलांनी नाव दिले पण, आधार दिला नाही. त्यामुळे त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी आई अंजू हिच्यावर येऊन पडली. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने मुलांचा सांभाळ करण्यासोबतच शिक्षणाचाही खर्च भागविण्यासाठी तीने मोलमजुरी करुन रोशनला शिकविले. रोशननेही आपल्या परिस्थितीची जाणीव ठेऊन कुठल्याही शिकवणी वर्गात न जाता जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली.
सुरुवातीला अपयश आले पण, खचून न जाता तयारीची गती वाढवित पोलीस उपनिरिक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करीत आपले, परिवाराचे व गावाचेही नाव ‘रोशन’ केले. त्यामुळे आईच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत आहे.
कामासह वाचन
त्याचे प्राथमिक शिक्षण येथील मॉडेल हायस्कू ल मध्ये पूर्ण झाले. आ.पंकज भोयर यांनी स्थापन केलेल्या बिरसा मुंडा सिव्हील सर्व्हिस फाउंडेशन मध्ये समन्वयक पदावर काम करीत तेथील ग्रंथालयातील पुस्तकच यशाचे गमक ठरले. त्याला श्यामराव बोबडे व महेश वसू यांनी सहकार्य केले.