बोरधरणाच्या पाण्याने रस्ता, शेती जलमय
By Admin | Updated: December 9, 2014 22:55 IST2014-12-09T22:55:37+5:302014-12-09T22:55:37+5:30
गत ४० दिवसांपासून ओलितासाठी वितरिकांत पाणी सोडण्यात आले आहे; पण साफसफाई करण्यात आली नाही़ यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी शिरत आहे़

बोरधरणाच्या पाण्याने रस्ता, शेती जलमय
घोराड/बोरधरण : गत ४० दिवसांपासून ओलितासाठी वितरिकांत पाणी सोडण्यात आले आहे; पण साफसफाई करण्यात आली नाही़ यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी शिरत आहे़ शिवाय परिसरातील रस्तेही जलमय झाले आहे़ संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्ते, शेतांचे नुकसान होत असून पाण्याचा अपव्यय होत आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
घोराड ते कोलगाव हा डांबरी रस्ता आहे़ या रस्ता व गावालगत वितरिका आहे़ गत काही वर्षांपासून बोर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी या वितरिकेच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केले आहे. वितरिकेवरून पाणी वाहत असल्याने ते लगतच्या शेतात शिरले आहे. शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतातून वाहणारे पाणी गत काही दिवसांपासून रस्त्यावर दिसून येत आहे़ यात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याचा अपव्यय होतो, त्या स्थळापासून अर्धा किमी अंतरावर बोर प्रकल्प पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. ही वितरिका पूर्णत: पाझरत असून वितरिकेला लागूनच असलेल्या घराशेजारी पाणी साचत आहे. याबाबतची तक्रार पंचायत समिती सदस्य रजनी तेलरांधे यांनी अधिकाऱ्यांना स्वत: भेटून केली; पण वितरिकेची दुरूस्ती करण्यात आली नाही. पाणी हे जीवन आहे. पाण्याचा अपव्यय पाहवला जात नाही. यामुळे बोरधरणातील पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी वितरिकेची दुरूस्ती व साफसफाई करावी, अशी मागणी घोराड ग्रा़पं़ चे उपसरपंच अमीत तेलरांधे यांनी पाटबंधारे विभागाला केली आहे.
नुकत्याच झालेल्या पं़स़ च्या आमसभेत तालुक्यातील बोर, पंचधारा, मदन उन्नई आदी प्रकल्पांच्या वितरिकेच्या साफसफाईचा मुद्दा गाजला. यात संबंधित अधिकाऱ्यांनी दुरूस्तीसाठी निधीच नसल्याने कामे कशी करावी, असा प्रश्न उपस्थित केला होता़ यामुळे पाण्याचा अपव्यय पाटबंधारे विभाग कसा थांबविणार, हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे़ पाटबंधारे विभागासह जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांद्वारे करण्यात येत आहे़(वार्ताहर)