माहिती अधिकार; कलम ४ बाबत सामान्य जनता अनभिज्ञ
By Admin | Updated: March 14, 2015 02:02 IST2015-03-14T02:02:05+5:302015-03-14T02:02:05+5:30
प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता असावी, अपवाद वगळता जनतेशी निगडीत कामांची माहिती सामान्य नागरिकांना मिळावी यासाठी ...

माहिती अधिकार; कलम ४ बाबत सामान्य जनता अनभिज्ञ
वर्धा : प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता असावी, अपवाद वगळता जनतेशी निगडीत कामांची माहिती सामान्य नागरिकांना मिळावी यासाठी माहिती अधिकार कायदा २००५ मंजूर करण्यात आला़ कायदा होऊन तब्बल दहा वर्षे लोटत आहेत; पण अद्यापही या कायद्याची संपूर्ण माहिती सामान्य नागरिकांना उपलब्ध होत नाही़ शिवाय प्रशासनही या कायद्याचे तंतोतंत पालन करीत नसल्याचेच दिसते़ यामुळे जिल्ह्यात केवळ एकाच कार्यालयात माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ चे पालन होत असल्याचे समोर आले आहे़
माहिती अधिकार कायद्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात माहिती अधिकारी व प्रथम अपिल अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे़ याबाबत संपूर्ण कार्यालयांमध्ये माहितीचा फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे़ हे फलक बहुतांश कार्यालयात लावलेले आहे; पण त्यातही अधिकारी बदलल्यास फलकावरील नाव बदलण्याची तसदी घेतली जात नाही़ अनेक कार्यालयांत सदर फलकही लावण्यात आलेले नाहीत़ कायदा पारित होऊन १० वर्षे लोटत असून अनेक अधिकाऱ्यांवर या कायद्याचा जरबही बसला आहे तरी कायद्याचे पालन करण्यात हयगय होत असल्याचे वास्तव आहे़
माहिती अधिकार कायद्यातील कलम चारबाबत संपूर्ण नागरिकांना माहिती असणे गरजेचे असते; पण त्याचे जिल्ह्यात कुठेही पालन होताना दिसत नाही़ माहिती अधिकार कायद्याच्या कलम चारमध्ये संबधित शासकीय कार्यालयाची माहिती अंतर्भुत करणे गरजेचे असते़ जिल्ह्यात एक कार्यालय सोडले तर कुठेही कलम चारबाबत माहिती नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवल्याचे आढळून येत नाही़ वर्धा उपविभागीय अधिकारी कार्यालयात सदर माहिती लावण्यात आलेली आहे़ यात कलम चारमध्ये नमूद केल्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत कर्मचारी ते कर्तव्य, जबाबदाऱ्यांबाबत माहिती नमूद करण्यात आलेली आहे़ यामुळे एसडीओ कार्यालयाच्या कामकाजाबाबत नागरिकांना अधिक विचारणा करण्याची गरज पडत नसल्याचे दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)
संबंधित विभागातील कर्मचारी ते कर्तव्यांची माहिती
माहिती अधिकारी अधिनियम २००५ च्या कलम ४ (१) नुसार संबंधित कार्यालयाची रचना, कर्तव्ये, जबाबदाऱ्या यासह कुठली कामे सदर ठिकाणी केली जातात, त्यासाठी किती कालावधी लागतो, ती कामे न झाल्यास जबाबदार कोण आदी इत्यंभूत माहिती प्रसिद्ध करावी लागते़ जिल्ह्यात कोणत्याही कार्यालयात ही माहिती दिली जात नाही; पण उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी या कलमाचे पालन करीत कलम ४ ची संपूर्ण माहिती नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करून दिलेली आहे़
उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आलेल्या या माहितीमुळे सामान्य नागरिकांना आपली कामे कुणाकडे न्यावी लागतात, त्यासाठी किती कालावधी लागतो, कामे न झाल्यास कुणाकडे दाद मागावी हे कुणाला विचारण्याची गरज पडत नाही़ जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी तत्सम माहिती सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते़