माहिती अधिकार हाच लोकशाहीचा मूलाधार
By Admin | Updated: January 3, 2016 02:38 IST2016-01-03T02:38:31+5:302016-01-03T02:38:31+5:30
स्वातंत्र्योत्तर काळातही ब्रिटिशकालीन कायद्यांचे अस्तित्व व प्रभाव दिसतो. देशात संविधानानुसार लोकशाही स्थापन झाली असली तरी....

माहिती अधिकार हाच लोकशाहीचा मूलाधार
विजय बोबडे : कायद्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम
वर्धा : स्वातंत्र्योत्तर काळातही ब्रिटिशकालीन कायद्यांचे अस्तित्व व प्रभाव दिसतो. देशात संविधानानुसार लोकशाही स्थापन झाली असली तरी त्या विरोधी असणारे कायदेही जैसे थे होते. ब्रिटिशकालीन गोपनीयता कायदा १९२३ पासून अलिकडच्या काळापर्यंत होता. यामुळे खऱ्या अर्थाने शासन कारभारात पारदर्शकता येऊ शकत नव्हती. अरुणा रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांनी जनआंदोलन करून माहितीचा अधिकार देणारा कायदा करण्यास केंद्र सरकारला प्रवृत्त केले. परिणामी, लोकशाहीला एक नवी दिशा मिळाली. माहितीचा अधिकार हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा मूलाधार आहे, असे मत डॉ. विजय बोबडे यांनी व्यक्त केले.
यशवंत महाविद्यालयात माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. एकनाथ मुरकुटे उपस्थित होेते.
डॉ. बोबडे पूढे म्हणाले की, माहितीच्या शोधासाठी पत्रकारांना फार कष्ट सहन करावे लागत होते. यामुळे त्यांनी या अधिकाराबाबत फार मोठा संघर्ष केला. हिंद किसान मजदूर शक्ती संघटन या संस्थेने सातत्याने जनआंदोलनाद्वारे संघर्ष केल्यामुळे राजस्थानमध्ये हा कायदा आधी झाला. महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारे यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे शासनाला हा कायदा करावा लागला. पूढे केंद्र शासनानेच २००५ मध्ये हा कायदा केला. यामुळे खऱ्या अर्थाने हे शासन जनतेप्रती उत्तरदायी झाले आहे. माहिती अधिकार कायद्यामुळे बऱ्याच बाबी सहज, सोप्या झाल्या असून अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे. माहितीचा अधिकार कायद्यामधील महत्त्वपूर्ण तरतुदींबाबत सविस्तर माहिती देताना प्रारंभी डॉ. बोबडे यांनी अधिकाराचा प्रभाविपणे वापर करावा, असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. देशमुख यांनीही माहिती अधिकार कायद्याबाबत माहिती दिली. कायद्याच्या सर्व पैलुंचा सविस्तर अभ्यास करून शासन, प्रशासनात अधिक पारदर्शकता, कार्यक्षमता आणण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर करावा. केवळ इतरांना त्रास देण्यासाठी शस्त्र म्हणून या कायद्याचा कदापि दुरूपयोग केला जाऊ नये, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एकनाथ मुरकुटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. रवींद्र बेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भाऊ बोंदाडे, रिंयाज शेख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (कार्यालय प्रतिनिधी)