प्रवाशांची ‘वाट बघतोय रिक्षावाला’...

By Admin | Updated: May 2, 2015 00:08 IST2015-05-02T00:08:45+5:302015-05-02T00:08:45+5:30

शहरात इतरत्र फिरण्यासाठी काही वर्षांपूर्वी नागरिक सायकल रिक्षाला प्राध्यान्य देत होते.

Rickshawala waiting for passengers ... | प्रवाशांची ‘वाट बघतोय रिक्षावाला’...

प्रवाशांची ‘वाट बघतोय रिक्षावाला’...

गतिमान युगात आॅटोला पसंती : शहरातील सायकलरिक्षा स्टँडवरही व्यावसायिकांचेच अतिक्रमण
वर्धा: शहरात इतरत्र फिरण्यासाठी काही वर्षांपूर्वी नागरिक सायकल रिक्षाला प्राध्यान्य देत होते. आॅटोची संख्याही तितकीशी नव्हती; परंतु या काही वर्षांत आयुष्य गतिमान झाल्यामुळे सायकलरिक्षावरून प्रवास करणारे प्रवासी आॅटो व इतर खासगी वाहनांवर आले. त्यामुळे सायकलरिक्षा चालकांवर प्रवाश्याची वाट पाहण्याची वेळ आली आहे.
सध्या एका चौकातून दुसऱ्या जाण्यासाठीही आॅटो वा दुचाकीचा वापर वाढला आहे. वर्धा शहरात देखील ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. प्रत्येकालाच कमीत कमी वेळात इतरत्र जावयाचे असते. आसपासच्या गावातील नागरिक नेहमीच वर्धा शहरात या ना त्या कामाने येत असतात. पूर्वी शहरात बस्थानकावरून आर्वी नाका, सेवाग्राम रेल्वेस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय कचेरी, जिल्हा परिषद आदी भागात नागरिकांना नेऊन देण्यासाठी सायकलरिक्षा ही महत्त्वाची भूमिका बजावत असे; परंतु हळूहळू इंधनावर चालत असलेले रिक्षा आणि वाहतुकीची इतरही साधनेही निर्माण झाली. वेळ वाचावा म्हणून नागरिक शहरात इतरत्र जाण्यासाठी आता आॅटोचा वापर करतात. नाईलाजेस्तोवच कधीकधीच नागरिक सायकलरिक्षाने जातात. त्यामुळे शहरातील बहुतेक सायकलरिक्षा हे मोडकळीस आले आहे. शहरात चौकाचौकात एखादा रिक्षावाला प्रवाश्यांची वाट पाहात असतात. परंतु दिवसदिवस एकही प्रवासी भेटत नसल्याची वेळही अनेकदा त्यांच्यावर येते. त्यामुळे एकेकाळी शहरांच्या प्रवासी व्यवस्थेचा कणा असलेल्या सायकलरिक्षा चालकांचाच कणा सध्या मोडला आहे. शहरात बोटावर मोजण्याइतके सायकलरिक्षा आजघडीला शिल्लक आहेत. त्यामुळे अनेकांचे रिक्षा हे मोडकळीस आले आहे. पर्याय नसल्याने अनेक रिक्षाचालक हा व्यवसाय करीत असले तरी गतिमान प्रवासी वाहनांच्या युगात आॅटोरिक्षाचालकांचे आयुष्य मात्र थांबले आहे.(शहर प्रतिनिधी)

स्कूलरिक्षावाले काका झाले हद्दपार
काही वर्षांपूर्वी लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी सायकलरिक्षा वाले काका महत्त्वाची भूमिका बजावत असे. एक भावनिक नातेही यात असायचे. त्यामुळे चढ असताना मुले स्वत: उतरून धक्का मारायचे. पण आता सुरक्षेच्या दृष्टीने स्कूलव्हॅनला पसंती दिली जात आहे. या कारणाने सायकलरिक्षांची मागणीही अचानक कमी झाली. याचाही विपरित परिणाम या व्यवसायावर झाला आहे. काही म्हातारे चालकच आज कसाबसा रिक्षा ओढताना दिसतात.

शहरातील रिक्षास्टँडवर अतिक्रमण
वाहतूक विभागाच्यावतीने शहरात बसस्थानकाच्या समोरासमोर रिक्षाचालकांसाठी जागा देण्यात आली आहे. त्यात रांगेने रिक्षा उभे असतात. परंतु रिक्षांची कमी होत जाणारी संख्या आणि पाहता येथे इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. दिवस दिवस बस्थानकावर एकही प्रवासी भेटर नसल्याने यातील बरेच रिक्षाचालक आपली रिक्षा ही स्थानकावर उभी न करता शहरात एखाद्या चौकात उभी करतात. प्रवासी नाही तर किमान एखादी वस्तू नेण्यासाठी तरी कुणी येईल या आशेवर ते असतात.

सायकलरिक्षा बनले किरकोळ मालवाहू
कधीकाळी प्रवासी वाहतुकीसाठी प्रसिद्ध असली सायकलरिक्षा सध्या किरकोळ माल वाहून नेण्याचे साधन बनले आहे. फ्रीज, कुलर, छोटी आलमारी अशी वाहने एखाद्याच्या घरी नेऊन देण्याचे काम सध्या रिक्षा करीत आहे. शहरात बोटावर मोजण्याइतके सायकलरिक्षा आज शिल्लक आहेत. त्यातील बरेच रिक्षा हे स्टँडवर थांबता दुकानांसमोर रिक्षा लावून उभे असतात. एखादी वस्तू घेतल्यावर आपली गरज पडेल अशी आशा त्यांना असते.

Web Title: Rickshawala waiting for passengers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.