वर्धा लोकसभा मतदार संघातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवा

By Admin | Updated: March 14, 2015 02:00 IST2015-03-14T02:00:38+5:302015-03-14T02:00:38+5:30

स्थानिक लोकसभा मतदार संघात रेल्वेच्या अनेक समस्या आहेत़ यामुळे रेल्वे प्रवासी त्रस्त आहेत़ रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी खासदार रामदास तडस ...

Resolve the problems of train passengers in Wardha Lok Sabha constituency | वर्धा लोकसभा मतदार संघातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवा

वर्धा लोकसभा मतदार संघातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवा

वर्धा : स्थानिक लोकसभा मतदार संघात रेल्वेच्या अनेक समस्या आहेत़ यामुळे रेल्वे प्रवासी त्रस्त आहेत़ रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली़ शुक्रवारी त्यांनी मतदार संघातील रेल्वेच्या समस्यांबाबत निवेदन सादर केले़
नागपूर वर्धा नांदेड रेल्वे लाईनकरिता ११० कोटी रुपये या वित्तीय वर्षात देण्यात आलेत़ शिवाय अमरावती मोर्शी नरखेड या मार्गाच्या उर्वरित कामासाठी २५ कोटी रुपये देण्यात आले़ नागपूर ते वर्धा रेल्वेलाईन तिहेरीकरणासाठी रेल्वे बजेडमध्ये समावेश करण्यात आला़ याबद्दल तडस यांनी निवेदनात वैदर्भीय जनतेच्यावतीने आभार व्यक्त केले.
वर्धा लोकसभा क्षेत्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच विनोबा भावे यांनी आपला वेळ घालविला आहे. यामुळे जिल्ह्याला महत्त्व प्राप्त झाले आहे़ हे महत्त्व लक्षात घेऊन मतदार संघातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्याची मागणी त्यांनी केली़ यात वर्धा ते पुणे विनोबा भावे एक्सप्रेस गाडी सुरू करावी, सेवाग्राम ते मुंबई महात्मा गांधी एक्स्प्रेस सुरू करावी, वर्धा रेल्वे स्थानकाला आंतरराष्ट्रीय स्तराचे रेल्वेस्थानक बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, आर्वी-पुलगाव (शकुंतला एक्सप्रेस) मार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करावा, रेलसेवा बहाल करण्याबाबत निधी उपलब्ध करून द्यावा, पुलगाव ते आमला ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करण्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, धामणगाव रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उपहार गृह, ओव्हर ब्रीज, शौचालय, संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्र वाढवावे, अपंगांकरिता रॅम्पची व्यवस्था करावी, सिंदी रेल्वेस्टेशनच्या सौंदर्यीकरणासह पार्किंग, उपहारगृह आदी व्यवस्था करावी, जलद गाड्या रेल्वे फलाटावर थांबविण्याबाबत कार्यवाही करावी, धामणगाव व हिंगणघाट यात्री निवास व फलाटाचे विस्तारिकरण करावे, चांदूर रेल्वे स्टेशनवर आरक्षण केंद्र देण्याची मागणी खासदार रामदास तडस यांनी निवेदनातून लावून धरली़
शिवाय गाडी क्र. १२६६५ चेन्नई अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसला पुलगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा, गाडी क्र. १२१६०/५९ जबलपूर अमरावती एक्सप्रेसला सिंदी रेल्वे व चांदूर रेल्वे येथे थांबा द्यावा, गाडी क्र. ११०४० गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सपे्रसचा सिंदी रेल्वेला थांबा द्यावा, गाडी क्र. १२११९/२० नागपूर-अमरावती इंटरसिटी एक्सप्रेसला सिंदी रेल्वे येथे थांबा द्यावा, गाडी क्र. ८४०१/०२ द्वारका एक्सप्रेसला चांदूर रेल्वे येथे थांबा द्यावा, आॅरेंन्स सिटी वरूड येथे सुपरफास्ट गाड्यांचे थांबे द्यावे, गाडी क्र. १२७९१/९२ चेन्नई जयपूर एक्सप्रेस, गाडी क्र. १६१२५/२६ चेन्नई जोधपूर एक्सप्रेस तसेच पटना सिंकदराबाद एक्सप्रेस गाड्यांना हिंगणघाट येथे थांबा देण्याची मागणी खा़ तडस यांनी निवेदनातून केली़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Resolve the problems of train passengers in Wardha Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.