राष्ट्रीयकृत बँकेत ग्रामस्थांची परवड
By Admin | Updated: August 14, 2014 23:52 IST2014-08-14T23:52:25+5:302014-08-14T23:52:25+5:30
येथील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे या बँकेत आर्थिक व्यवहाराकरिता आलेल्या ग्राहकांना ताटकळत रहावे लागते.

राष्ट्रीयकृत बँकेत ग्रामस्थांची परवड
साहूर : येथील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे या बँकेत आर्थिक व्यवहाराकरिता आलेल्या ग्राहकांना ताटकळत रहावे लागते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत ग्राहकांची ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी होत आहे.
साहूर येथे बँक आॅफ इंडिया तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा दोन शाखा कार्यरत होत्या. परंतु काही महिन्यांपूर्वी येथील शाखा बंद झाली आहे. यामुळे सर्व व्यवहार एकमेव शाखा असलेल्या बँक आॅफ इंडिया येथे वळते केले आहे. परिसरातील २० ते २५ गावातील नागरिकांचे व्यवहार याच शाखेतून सुरू आहेत. यामुळे खातेदारांची संख्या कमालीची वाढली आहे. यातच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामाचा निपटारा लवकर होत नाही. परिसरातील सर्व कर्मचारी आणि बचत गटाचे व्यवहार याच बँकेतून होत आहे. परंतु या शाखेत तीनच कर्मचारी आहे. परिणामी ग्राहकांना सुरळीत सेवा मिळत नाही.
येथील शाखेत रोख व्यवहाराचे एकच काऊंटर असल्याने पैशाचा व्यवहार करताना ग्राहकांना तब्बल तीन तास रांगेत उभे राहण्याची वेळ येते. याबाबत शाखा व्यवस्थापक मिथिलेश मालाकर यांच्याकडे ग्राहकांनी तक्रार दिली आहे. व्यवस्थापक आणि दोन कर्मचारी असे येथील शाखेच्या पदाचे स्वरुप आहे. यातही ब्रॉडबॅड सेवेत व्यत्यय येत असल्याने ही बाब ग्राहक सेवेत आडकाठी ठरते. इंटरनेटसेवा वारंवार खंडित होत असल्याने कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे ग्राहकांची परवड होत असल्याने बऱ्याचदा येथील कर्मचाऱ्यांना नाहक ग्राहकांच्या रोशाला बळी पडावे लागते.
ग्राहकांना तासनतास ताटकळत राहावे लागत असून अडचणीच्यावेळी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सदर कामे करावी लागतात. येथील शाखेत रोख व्यवहाराचे एकच काऊंटर असल्याने ग्राहकांची कायम रांग लागलेली असते. येथे अतिरीक्त कर्मचारी नियुक्त करून येथे अतिरीक्त काऊंटर देण्याची मागणी केली जात आहे. साहुरवासीय आणि परिसरातील ग्रामस्थांना बँकेचे काम करण्याकरिता ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे काही खातेदार सकाळपासून कार्यालयासमोर रांगा लावतात.
खातेदारासह कर्मचाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. खातेदारांची संख्या वाढतच असल्याने कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येते. यामुळे सेवा देखील प्रभावित होते. येथील शाखेचा वाढता व्याप पाहता सदर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचारी संख्या वाढवित दोन कॅश काऊंटर सुरू करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)