अवैज्ञानिक कृतींच्या वापर प्रकरणी गुन्हा नोंदवा
By Admin | Updated: July 31, 2014 00:10 IST2014-07-31T00:10:29+5:302014-07-31T00:10:29+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपास करण्याकरिता प्लॅन्चेट सारख्या अवैज्ञानिक कृतीचा वापर केला. या प्रकरणी चौकशी करून गुुन्हा नोंदविण्यात यावा

अवैज्ञानिक कृतींच्या वापर प्रकरणी गुन्हा नोंदवा
वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपास करण्याकरिता प्लॅन्चेट सारख्या अवैज्ञानिक कृतीचा वापर केला. या प्रकरणी चौकशी करून गुुन्हा नोंदविण्यात यावा यासाठी समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार आणि जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले यासह शिष्टमंडळाने निवेदन दिले. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी उभी हयात भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य म्हणून दिलेला वैज्ञानिक दृष्टीकोण स्वत: अंगिकारून तो जनसामान्यात रुजविण्याकरिता प्रयत्न केले. प्लॅन्चेट हा अवैज्ञानिक आणि अविश्वासार्ह असणारा प्रयोग किंवा कृती होय. मात्र पोलिस विभागाने स्वत: वरचा विश्वास गमावून प्लॅन्चेटच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी, कार्मचारी यांना डॉ. दाभोकरांच्या हत्येचा तपास लावण्याचा प्रकार आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या सुचनेवरून केल्याचा गौप्यस्फोट एका मासिकाने केला. पुराव्यासह हे वृत्त प्रकाशित केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेची बदनामी होवून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. त्यामुळे कर्तबगार पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे मानसिक खच्चीकरण झालेले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी उच्च पदस्थ पोलीस अधिकारी, न्यायाधिश किंवा सी.आय.डी.मार्फत करून असा प्रकार घडला असल्यास गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा शाखेद्वारे निवेदन देवून मागणी करण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळात प्रा. धनंजय सोनटक्के, प्रशांत कांबळे, सारिका डेहनकर, मयुर डफळे, अनिल मुरडीव, श्रेया गोडे, राजेंद्र ढोबळे, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ, सावित्रीबाई फुले बचत गटाच्या रत्नमाला साखरे, नरेंद्र कांबळे, विशाल सुरकार आदींचा सहभाग होता.(स्थानिक प्रतिनिधी)