पुलाच्या दुरुस्तीचे कामही दर्जाहीन
By Admin | Updated: January 12, 2016 01:59 IST2016-01-12T01:59:18+5:302016-01-12T01:59:18+5:30
सेलू ते हिंगणी या मार्गावरील किन्ही गावालगतचा पूल अपघाताला निमंत्रण देणारा ठरत होता.

पुलाच्या दुरुस्तीचे कामही दर्जाहीन
ग्रामस्थांची ओरड : एकाच पावसात पूल वाहून जाण्याची भीती
बोरधरण : सेलू ते हिंगणी या मार्गावरील किन्ही गावालगतचा पूल अपघाताला निमंत्रण देणारा ठरत होता. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच बांधकाम विभागाने पुलाची दुरूस्ती केली. पण नव्याने झालेले पुलाचे कामही दर्जाहिन झाल्याची ओरड नागरिकांद्वारे व प्रवाश्यांद्वारे होत आहे.
सेलू ते हिंगणी हा मार्ग बोरधरणकडे जाणाऱ्या पर्यटकांसह नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचा आहे. नागपूर करिता हा मार्ग जवळचा असल्याने या मार्गावरून दिवसभर प्रवाशांची वर्दळ असते. बोर अभयारण्याला भेट देण्याकरिता येणाऱ्या पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र वाहनांची गर्दी वाढू लागली आहे.
अशातच रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतातील पाणी नदीपात्रात वाहून जाण्यासाठी असलेल्या किन्ही गावाजवळील लहान पुलाची अत्यंत दुरवस्था झाली होती. रस्त्याखालून सिमेंट पायल्या टाकून सदर पूल तयार करण्यात आला होता. वाढलेल्या वाहतुकीमुळे तीन ते चार वर्षांपूर्वी पुलाच्या दोन्ही बाजू खचल्या होत्या. त्यामुळे पूल नरजेस पडत नव्हता. रात्रीला अपघाताच्या घटना वाढू लागल्या होत्या.
यासंदर्भात लोकमतने काही दिवसांपूर्वी बातमी प्रकाशित करताच सदर पुलाचे काम नव्याने करण्यात आले. नवीन पायल्या टाकण्यात आल्या. परंतु पायल्या टाकताना केवळ माती टाकून तकलादू काम करण्यात आले. यामुळे दुरुस्तीचे कामही निकृष्ठ केल्याने या कामाचा फायदा काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. केवळ माती व मुरूम टाकण्यात आल्याने येथे वाहने घसरण्याची शक्यता बळावली आहे. तसेच एकाच पावसात नालीसहीत रस्त्याच वाहून जाण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलाचे पक्के बांधकाम करून मागणी होत आहे. अपघाताची शक्यता लक्षात घेता ही गरज व्यक्त होत आहे.(वार्ताहर)
अपघाताचा धोका कायम
तुटलेल्या पुलाचे काम करताना तेथीलच माती टाकून पुलाचे तात्पुरते काम करण्यात आले. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नवीन पायल्या टाकताना जोत्याचा भर टाकणे आवश्यक असताना तसे न करताच पायल्या टाकण्यात आल्या.
एवढेच नव्हे तर पायल्या पायल्या घसरू नये यासाठी सिमेंट काँक्रीट टाकणे आवश्यक असतानाही केवळ माती व मुरूम टाकण्यात आले. त्यामुळे हा पूल केव्हा खचून जाईल याचा नेम नाही. रोजचे पाणी वाहून जातानाही यातील माती वाहून जात आहे. त्यामुळे पुढे जाऊन मोठा धोका निर्माण होण्याचे शक्यता बळावली आहे.
पुलाची अवस्था पाहता एकाच पावसात हा पूल वाहून जाण्याची शक्यता असल्याचे प्रवासी व ग्रामस्थ सांगत आहेत.
पक्के बांधकाम करण्याची मागणी
बोरधरणकडे जाणाऱ्या पर्यटकांसह नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा पूल सोयीचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते.रात्रीलाही हा रस्ता वाहता असल्याने हा पूल धोक्याचा ठरत आहे. त्यामुळे सदर पुलाचे पक्के बांधकाम करण्याची मागणी होत आहे.