भूतदया, करुणा, अहिंसेतून परमेश्वराची प्राप्ती करा

By Admin | Updated: February 8, 2015 23:38 IST2015-02-08T23:38:38+5:302015-02-08T23:38:38+5:30

मानवदेह मिळाल्यानंतर दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपण झिजलो पाहिजे. आपल्या सदाचार सत्कर्मातून इतरांना मदत करा. जात, धर्म पंथाच्या भिंती पाडून एकमेकांवर करूणा,

Receive God from the past, compassion, and non-violence | भूतदया, करुणा, अहिंसेतून परमेश्वराची प्राप्ती करा

भूतदया, करुणा, अहिंसेतून परमेश्वराची प्राप्ती करा

मुनीश्री सुवीरसागर यांचे आवाहन
पुलगाव : मानवदेह मिळाल्यानंतर दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपण झिजलो पाहिजे. आपल्या सदाचार सत्कर्मातून इतरांना मदत करा. जात, धर्म पंथाच्या भिंती पाडून एकमेकांवर करूणा, पे्रमाचे अमृतसिंचन करा. जगा व दुसऱ्यांना जगू द्या या तत्वाचा अंगीकार करून अहिंसेच्या सुंदर मार्गाने आपल्या जीवनाचे सार्थक करा. देवालये, प्रार्थनामंदिरांमधील दगडांच्या देवाचा शोध घेणाऱ्यांनो परमेश्वर हा भूतदया करूणा, पे्रम, अहिंसा, बंधूभावातून प्राप्त होत असतो असे रोखठोक विचार बोधामृत कथामालेचे समारोपीय प्रवचनपुष्प गुंफताना मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांनी व्यक्त केले.
महाराज म्हणाले, कुंभाराकडील मातीच्या गोळयास सुवासिनीच्या डोक्यावर मंगलकलश म्हणून स्थान मिळविण्यासाठी माती पायदळी तुडविण्यापासून भट्टीत भाजण्यापर्यंत अग्नी दिव्यातून जावे लागते. पाषाणाला देवत्वाची प्राप्ती होण्यासाठी लोहाराच्या घणाचे घाव सहन करावे लागतात. सुंदर आभुषण होण्यासाठी सुवर्णाला सोनाराच्या मुशीतून जावे लागते. तसेच मानवी जीवनाचेही आहे. सदाचार सहनशीलता व फळाची अपेक्षा न करता केलेले कर्तव्य व संकटाशी सामना करण्याची तयारी तसेच अग्नीदिव्यातून संघर्ष केला तर तुमच्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
सुवीरसागर पुढे म्हणाले, काही लोक नावासाठी कार्य करतात. रस्त्यावर चौकात, मंदिरात नावे लिहितात. पण व्यक्तीने कामच असे करावे की त्याचे नाव फलकावर नाही तर लोकांच्या हृदयात कोरले जाईल. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने, होते. पुष्करणीच्या अस्तित्वाने कमळ फुलते तसेच शुद्ध भाव, लीनता, सहनशीलता आणि भक्तीमध्येच परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी असतो.
दुख मे सुमीरन सब करे सुख मे ना करे कोय, सुख मे सुमीरन करे तो दुख काहे को आय’ या संत कबिराच्या दोह्याचा संदर्भ, संतश्रेष्ठ तुकोबारायांची ईश्वरभक्ती, दिल्लीचा लालकिल्ला व अकबर बिरबलचा किस्सा, गौतमबुद्ध राजहंस, भगवान महावीर व गौतम स्वामी यांच्या अनेक संदर्भकथेचे दाखले देवून मुनीश्रींनी परमेश्वराची भक्ताकडून अपेक्षा हा विषय भाविकांसमोर आपल्या बोधामृत रसपानातून मांडला. या कथामालेसाठी सतत तीन दिवस शहर व पंचकोशीतून समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांनी भरगच्च उपस्थिती दर्शवून अहिंसा व गोरक्षण चळवळीला बळकटी दिली.
श्रोत्यांची दोन दिवस अल्पोपहाराची व्यवस्था सुभाष वंजारी यांनी केली होती. यशस्वीतेकरिता मुनी सेवा समिती, महिलामंच, जैन युवा मंच व सकल जैन समाज बांधवांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Receive God from the past, compassion, and non-violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.