निवडणुकीच्या नावावर तहसील कार्यालय रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:02 IST2019-03-29T23:54:57+5:302019-03-30T00:02:19+5:30
येथील तहसील कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते. कार्यालयात आलेल्यांना अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगतात. त्यामुळे अनेकांना कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या पाहूनच परतावे लागतात. त्यामुळे तीव्र रोष व्यक्त होत आहे.

निवडणुकीच्या नावावर तहसील कार्यालय रामभरोसे
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : येथील तहसील कार्यालयात दररोज नागरिकांची गर्दी असते. कार्यालयात आलेल्यांना अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगतात. त्यामुळे अनेकांना कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या पाहूनच परतावे लागतात. त्यामुळे तीव्र रोष व्यक्त होत आहे.
तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांना शिधा पत्रिका, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आदीची गरज असल्याने ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या कार्यालयात येतात. विशेषत: २५ पायऱ्या चढून या कार्यालयात जावे लागत असल्याने याचा वयोवृद्धांना मोठा त्रास होत आहे. त्यातही कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन घ्यावे लागत आहे. बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यालयात राहत असून त्यांना विचारणा केल्यावर तेही उडवाउडवीचे उत्तर देत निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगतात. काही कर्मचारी तर आलेल्यांना दमदाटी करीत कुणाला तक्रार करायची असेल त्यांच्याकडे तक्रार करा, असा उपराटा सल्लाही देत असल्याने नागरिकांचा पारा चढत आहे.
शुक्रवारी आमगाव (खडकी) येथील वृद्ध नागरिक नामदेव रामाजी नेहारे हे सकाळी ११ वाजता स्टॅम्प अपेडेव्हीट करण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते. त्यांनी तहसील कार्यालयातील सर्व टेबलवर चौकशी केली पण कुणीही माहिती दिली नाही. कामाच्या प्रतीक्षेत इतक्या उन्हाच्या तीव्रतेत दुपारी अडीच वाजतापर्यंत ताटकाळत राहीले. परंतू एकही अधिकारी व कर्मचारी उपलब्ध झाला नाही. हाच अनुभव इतरही नागरिकांना आला.
तहसील कार्यालय सकाळी १० वाजता उघडले असले तरी १०.३० वाजतापर्यंत एकही कर्मचारी या कार्यालयात उपस्थित नव्हता.त्यामुळे कार्यालयातील वस्तू व दस्तऐवजाची सुरुक्षा वाºयावरच असल्याचे दिसून आले. मागील आठवड्यात आल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण सांगितले जात होते तर आता लोकसभा निवडणुकीचे कारण दिले जात असल्याने नागरिकांनी किती दिवस प्रतीक्षा करावी, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
...तर कार्यालय कुलूप बंद ठेवावे
कार्यालयात कामानिमित्त आलेल्यांना सध्या निवडणुकीच्या कामांचा व्यस्त असल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांना आल्यापावलीच परतावे लागत असल्याने कारण देण्यापेक्षा कार्यालयच कुलूप बंद करुन ठेवा, असा संताप व्यक्त होत आहे.