कारंजा तालुक्यात पावसाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST2019-09-06T06:00:00+5:302019-09-06T06:00:08+5:30
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कारंजा येथे शिक्षणासाठी येणारे खापरी, सावरडोह, सिंदीविहिरी येथील विद्यार्थी रात्री १० ते ११ वाजेपर्यंत बस कारंजा बसस्थानकावरून पूर उतरेपर्यंत न सोडण्यात आल्याने बसस्थानकावरच ताटकळत होते.

कारंजा तालुक्यात पावसाचा कहर
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहा:कार उडाला. जनजीवन प्रभावित झाले. दानापूर येथील शेतकरी धाम नदीत वाहून गेला. गुणवंत घसाड (५०) असे शेतकºयाचे नाव आहे. वृत्त लिहितोवर मृतदेहाचा शोध लाग शकला नव्हता. तसेच ढगा येथील शेतकरी विजय चपंत कुरसंगे यांची बैलजोडी धाम नदीच्या महापुरात वाहून गेली. दोन्ही घटनेची तहसीलदार सचिन कुमावत यांनी नोंद घेतली असून रात्री १० वाजतापर्यंत घटनास्थळावर उपस्थित होते.
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कारंजा येथे शिक्षणासाठी येणारे खापरी, सावरडोह, सिंदीविहिरी येथील विद्यार्थी रात्री १० ते ११ वाजेपर्यंत बस कारंजा बसस्थानकावरून पूर उतरेपर्यंत न सोडण्यात आल्याने बसस्थानकावरच ताटकळत होते. याविषयी शिक्षकांना माहिती मिळताच इंदिरा कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा किनकर, मॉडेल हायस्कूलचे पर्यवेक्षक ढोले, कपारे, प्रदीप झुटी, कस्तुरबा विद्यालयाचे बाबाराव मानमोडे, ढबाले आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरी नेऊन त्यांची जेवणाची व्यवस्था केली. तहसीलदार कुमावत यांनीही रात्री १० वाजता बसस्थानक गाठून परिस्थितीची माहिती घेतली. पूर ओसरत नाही तोवर बस न सोडण्याबाबत वाहतूक नियंत्रकांना सूचना दिल्या.
मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी
कारंजा तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिसरातील अनेक शेतींमध्ये अद्याप पाण्याचे डबके साचलेले असून पीकही पाण्याखाली आले आहे. शासकीय यंत्रणेने पिकांची पाहणी करून तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या जेवणाची केली व्यवस्था
कारंजा तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कारंजा येथे शिक्षणाकरिता येणारे खापरी, सावरडोह, सिंदीविहिरी येथील शेकडोवर विद्यार्थी बसस्थानकावरच रात्री उशिरापर्यंत ताटकळत होते.या विद्यार्थ्यांची मुख्याध्यापिका, शिक्षकांनी जेवणाची व्यवस्था केली. तहसीलदारांनीही परिस्थिती जाणून घेतली.