जिल्ह्यात पावसाची संततधार
By Admin | Updated: July 23, 2014 00:07 IST2014-07-23T00:07:55+5:302014-07-23T00:07:55+5:30
पावसाने जिल्ह्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावली असून, मागील दोन दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३.५९ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात पावसाची संततधार
वर्धा : पावसाने जिल्ह्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावली असून, मागील दोन दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३.५९ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. नदी व नाले ओसंडून वाहत असून, लालनाला सिंचन प्रकल्पामधून पाणी सोडण्यात आले आहे.
दिवसभर सुरू असलेल्या पावसाने सांयकाळी चांगलाच जोर धरला. यामुळे लाल नाला धरणाचे पाचही दार उघडण्यात आल्याने मार्डा येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. शिवाय या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वाधिक २८.२० मि. मी. पाऊस समुद्रपूर तालुक्यात पडला असून, वर्धा येथे १६.३० मि. मी., हिंगणघाट १७.०० मि. मी., सेलू १२ मि. मी., देवळी १२.६० मि. मी., कारंजा १०.२० मि. मी., तर आर्वी व आष्टी तालुक्यात सरासरी ६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडला असला तरी हा पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पाच्या जलाशयाच्या पातळीतही वाढ होत असून, बोर प्रकल्पामध्ये ४२.५८ द.ल.घ. (३४.५६), धाम प्रकल्प १२.१२ द.ल.घ. (२०.३८ टक्के), पोथरा प्रकल्प ३३.६३ द.ल.घ. (९६.८४ टक्के), पंचधारा प्रकल्प १.६० द.ल.घ. (१८.२८ टक्के), डोंगरगाव प्रकल्प १.६६ द.ल.घ. (२४.२ टक्के), लालनाला प्रकल्प १६.२८ द.ल.घ. (५८.९७ टक्के), नांद प्रकल्प ३४.७२ द.ल.घ. (६५.३० टक्के), वर्धा प्रकल्प ६.६४ द.ल.घ. (४४.५९ टक्के), उर्ध्ववर्धा प्रकल्प २०९.८० द.ल.घ. (३७.२० टक्के), निम्न वर्धा प्रकल्प ६०.०१ द.ल.घ. (२७.६७ टक्के), बेंबळा प्रकल्प ७०.५० द.ल.घ. (२३.२९ टक्के) तर सुकळी लघु प्रकल्पात ६.१७ द.ल.घ. (६०.८ टक्के), पोथरा प्रकल्प ३३.९० द.ल.घ. (९७.६३ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे.(प्रतिनिधी)