Rain for 'soybeans' 'villain' | ‘सोयाबीन’साठी पाऊस ठरतोय ‘खलनायक’

‘सोयाबीन’साठी पाऊस ठरतोय ‘खलनायक’

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने लावली हजेरी : शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

विनोद घोडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : शेतकऱ्यांचे दिवाळी बोनस म्हणून ओळख असणाऱ्या सोयाबीन पिकांसाठी सध्या परतीचा पाऊस खलनायक ठरत असल्याचे चित्र चिकणी परिसरात बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, रविवारी सकाळी या भागात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
यंदाच्या वर्षी सुरूवातील पावसाने दडी मारली. तर नंतर दोन महीने थांबून थांबून मुसळधार पाऊस पडला. तशी नोंदही महसूल विभागाने घेतली आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना निंदण व खत देण्याच्या कामासह औषधी फवारणीचे काम करता आले नाही. शिवाय परिसरातील अनेक शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले होते. सततच्या पावसाचा फटकाच उभ्या सोयाबीन पिकावर दिसून आला. तर अजूनही काही शेतांमधील शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा आहे. या भागातील सोयाबीन उत्पादकांनी जीवाचे रान करून पिकाची निगा घेतल्याने पीक बहरले.
सध्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनीही सोयाबीनची कापणी केली. तर काहींनी सोयाबीनची कापणी करून यंत्राच्या सहाय्याने सोयाबीनची मळणी केली. काही शेतकऱ्यांना एकरी ७ ते ८ तर काहींना ४ ते ५ पोती सोयाबीनचा उतारा आल्याचे शेतकरी सांगतात. असे असले तरी अजूनही अनेकांच्या शेतात कापलेले सोयाबीन पडून आले. अशातच रविवारी सकाळी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
यंदा पाऊस सोयाबीन पिकासाठी खलनायक ठरत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. शिवाय सोयाबीनच्या उत्पन्नातही बºयापैकी घट येत असल्याचे या भागातील शेतकरी सांगतात.

सोयाबीन शेतातून थेट मार्केटमध्ये
ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांची कापणी करीत मळणी केली, त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या पदरी आलेले सोयाबीनचे उत्पादन थेट बाजारपेठेत विक्रीकरिता नेले. सध्या सोयाबीनला ३ हजार ते ३ हजार ३०० पर्यंत भाव मिळत आहे. दिवाळी सण तोंडावर असल्याने अनेक शेतकरी सोयाबीनची साठवण न करता थेट विक्रीवरच भर देत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Rain for 'soybeans' 'villain'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.