आला सोसाट्याचा वारा, कोसळल्या पाऊसधारा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 05:00 IST2022-06-01T05:00:00+5:302022-06-01T05:00:29+5:30

वर्ध्यात दुपारच्या सुमारास आलेल्या वादळामध्ये शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगतच्या एका गॅरेजसह एका सामाजिक संस्थेच्या कार्यालयावर वृक्ष कोसळले. यादरम्यान गॅरेजमध्ये वाहन दुरुस्तीचे काम करीत असलेले चौघे थोडक्यात बचावले. गॅरेजच्या छतावर वृक्ष कोसळल्यानंतर त्या खाली असलेले चौघेही कसेबसे बाहेर पडले. यात कोणतीही दुखापत झाली नसली तर गॅरेजसह कार्यालयाचे मोठे नुकसान झाले.

rain ... | आला सोसाट्याचा वारा, कोसळल्या पाऊसधारा...

आला सोसाट्याचा वारा, कोसळल्या पाऊसधारा...

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केरळनंतर कर्नाटकाच्याही काही भागांत मान्सूनचे आगमन झाले असून येत्या ६ जून रोजी राज्यात धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आता वातावरणातही बदल झाला असून शेतकऱ्यांनाही मान्सूनचे वेध लागले आहे. अशात मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊसधाराही कोसळल्या. या वादळामध्ये शहरासह काही ग्रामीण भागातील वृक्षही उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. विशेषत: या वादळात महावितरणच्या विद्युत वाहिन्यांवर वृक्षांच्या फांद्या पडल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे काही काळ विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. विशेषत: पावसाच्या सरीवर सरी आल्याने नागरिकांचीही धावपळ उडाली. 

शिवाजी चौकात चौघे बचावले
-   वर्ध्यात दुपारच्या सुमारास आलेल्या वादळामध्ये शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगतच्या एका गॅरेजसह एका सामाजिक संस्थेच्या कार्यालयावर वृक्ष कोसळले. यादरम्यान गॅरेजमध्ये वाहन दुरुस्तीचे काम करीत असलेले चौघे थोडक्यात बचावले. गॅरेजच्या छतावर वृक्ष कोसळल्यानंतर त्या खाली असलेले चौघेही कसेबसे बाहेर पडले. यात कोणतीही दुखापत झाली नसली तर गॅरेजसह कार्यालयाचे मोठे नुकसान झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पाच दुचाकी दबल्या, ये-जा होती बंद
-    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एका प्रवेशद्वारावर असलेले गुलमोहराचा वृक्ष कोसळल्याने या कार्यालयातील आवागमन बंद झाले होते. तसेच या परिसरात असलेल्या पाच दुचाकीही या वृक्षाखाली दबल्या होत्या. त्यामुळे या दुचाकीचे नुकसान झाले असून याची माहिती नगरपालिकेला देण्यात आली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून हे वृक्ष हटविले. त्यानंतर दीड-दोन तासांनी ये-जा सुरु झाली होती.

मांडगाव मार्गावरील वाहतूक प्रभावित
-    मांडगाव ते शेडगाव या मुख्य मार्गावरील वणानदीजवळ दुपारी तीन वाजताच्या सुमारास वादळाने बाभळीचे झाड रस्त्यावर पडले. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक प्रभावित झाली असून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. मांडगाव येथे आज आठवडी बाजार असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ होती; परंतु झाड कोसळल्याने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली.

 

Web Title: rain ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस