रामनगरात राडा

By Admin | Updated: August 17, 2014 23:20 IST2014-08-17T23:20:07+5:302014-08-17T23:20:07+5:30

स्वातंत्र्य दिनी निघालेल्या मिरवणुकीत झालेल्या वादाचा वचपा काढण्याकरिता वर्धेतील महादेवपूरा येथील एका गटाने रामनगर येथील दुसऱ्या गटावर तलवारी व लाठ्याकाठ्यासह हल्ला चढविला.

Rada in Ramnagar | रामनगरात राडा

रामनगरात राडा

दोन्ही गटांवर गुन्हे : ११ जणांना अटक
वर्धा : स्वातंत्र्य दिनी निघालेल्या मिरवणुकीत झालेल्या वादाचा वचपा काढण्याकरिता वर्धेतील महादेवपूरा येथील एका गटाने रामनगर येथील दुसऱ्या गटावर तलवारी व लाठ्याकाठ्यासह हल्ला चढविला. यात दोन्ही गटात जबर हाणामारी झाली. या हाणामारीत परिसरात तोडफोडही करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
या प्रकरणी रात्री शहर ठाण्यात दोन्ही गटांच्या तक्रावरीवरून एकमेंकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावर कारवाई करीत एकूण अकरा आरोपींना घटनेच्या रात्रीच अटक करण्यात आली. अटकेतील आरोपींकडून दोन तलवारी व लाठ्या काठ्या जप्त करण्यात आल्या. सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यात आसिफ शेख महेबुब शेख, रूपेश नागदिवे, परवेज खान, शेख वसीम अब्दुल सत्तार सर्व रा. पुलफैल व शेख महोम्मद शेख गफ्फार रा. महादेवपुरा या पाच जणांसह उमेश उर्फ किसन राऊत, खुशाल राऊत, सौरभ आलोणे, राकेश दंडारे, प्रभाकर क्षिरसागर रा. तुकाराम वॉर्ड व सचिन कुमरे रा. कारला रोड या सहा जणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यदिनी निघालेल्या एका मिरवणुकीत राकेश नारायण दंडारे रा. तुकाराम वॉर्ड व आशिष पुरोहित रा. गुलशन हॉटेलजवळ या दोघांत वाद झाला. या वादात दोघांत चांगलीच शाब्दीक चकमक उडाली. या प्रकरणाचा वचपा काढण्याकरिता आशिष याने त्याच्या सहकाऱ्यासह रामनगर परिसरातील तुकाराम वॉर्ड येथे हल्ला चढविला. यावेळी त्याच्यासोबत परवेज, जुनेद, जुबेर या तिघांसह आणखी दहा ते बारा जण असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यादरम्यान पानटपरीवरून खर्रा घेवून परत येत असलेल्या राकेश दंडारे याला मारहाण करण्यात येत असल्याची माहिती मिळताच बंटी राऊत, आशिष राऊत, अमित कावळे याच्यासह दहा ते बारा जणांनी त्याच्यावर हल्ला चढविला. यात दोन्ही गटात जबर मारहाण केली. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
या वादाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी काही जणांना जागीच ताब्यात घेण्यात आले. या हल्ल्यात तोडफोड झालेल्या तिनही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. सोबतच हल्ल्यात वापरण्यात आलेल्या तलवारी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी राकेश दंडारे व आशिष पुरोहित या दोघांनी एकमेकांविरूद्ध दिलेल्या तक्रारीवरून भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३२४, ४२७ तसेच हत्यार कायद्याच्या कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार बुराडे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक बाबरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. अटकेतील आरोपींना रविवारी न्यायालयात सादर केल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Rada in Ramnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.