रबीमध्ये वाढणार हरभऱ्याचा पेरा
By Admin | Updated: October 22, 2015 03:44 IST2015-10-22T03:44:57+5:302015-10-22T03:44:57+5:30
जिल्ह्यात पेरणीच्या काळात पावसाने डोळे वटारले. यानंतर गरजेच्यावेळी पुन्हा पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचा

रबीमध्ये वाढणार हरभऱ्याचा पेरा
वर्धा : जिल्ह्यात पेरणीच्या काळात पावसाने डोळे वटारले. यानंतर गरजेच्यावेळी पुन्हा पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातचा गेला. यामुळे ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांची रबीकडून अपेक्षा आहे. जिल्ह्यात रबी हंगामातील पेरणीचा जिल्हा कृषी विभागाच्यावतीने आराखडा तयार करण्यात आला आहे. या नियोजनात गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचा पेरा अधिक होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात १ लाख १० हजार हेक्टरवर रबीचा पेरा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या नियोजनानुसार गव्हाची पेरणी ३३ हजार हेक्टरमध्ये तर हरभऱ्याची पेरणी ६९ हजार ५०० हेक्टरमध्ये होणार असल्याचे भाकित वर्तविले आहे. गत हंगामातही गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचा पेरा अधिक झाला होता. गव्हाचा पेरा २१ हजार ३५२ हेक्टर तर हरभऱ्याचा पेरा २९ हजार ५६९ हेक्टर होता. तोच अंदाज यंदाही कायम असल्याचे नियोजनावरून दिसून येते. असे असले तरी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने हे नियोजन बिघडण्याचे संकेत आहेत. पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने जमीन भेगाळत आहे. यामुळे कृषी विभागाचे नियोजन कागदावरच तर राहणार नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
गहू आणि हरभऱ्याव्यतिरिक्त उन्हाळी ज्वारीची पेरणी अडीच हजार हेक्टरमध्ये, उन्हाळी भूईमुंग चार हजार हेक्टर, सूर्यफुल १५०, जवस २०० तर मक्याची पेरणी ४०० हेक्टरमध्ये होणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक गव्हाचे पेरणीक्षेत्र सेलू तालुक्यात आहे. त्यापाठोपाठ वर्धा आणि समुद्रपूर तालुक्यात आहे.
२०१३ च्या हंगामामध्ये रबी हंगामातील पेरणी क्षेत्र ७६ हजार हेक्टर एवढे वाढले होते. मागील हंगामामध्ये रबीचे पेरणीक्षेत्र एक लाख १० हजार हेक्टर एवढे होते. या हंगामामध्येही रबीचे पेरणी क्षेत्र १ लाख १० हजार हेक्टर कायम राहणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
दसऱ्याच्या मुहूर्तावरही कापूस शेतातच
४आर्वी - गत तीन वर्षांपासून नापिकी व नैसर्गिक संकटाचे प्रमाण वाढत आहे. वातावरणातील बदलाचा फटका शेतपिकांना बसत आहे. या नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून पूर्णत: निघून गेला. खरीप हंगामात नापिकीचा सामना करावा लागला. खरीप हंगामातील पिकांना लावलेल्या खर्चापैकी अर्धा खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडला नाही. विजयादशमी हा सण आला असतानाही कापूस शेतातच आहे. यामुळे शेतकरी चिंतीत दिसतात.
४सध्या शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांसाठी धडपड सुरू झाली आहे. सोयाबीन हे नगदी व आराजी देणारे पीक म्हणून ओळखले जाते; पण या पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. मागील वर्षी तालुक्यातील अतिवृष्टी व अवकाळी पावसाने पिके बुडाली. यंदा उत्पादन चांगले होईल, अशी आशा होती; पण अनियमित पावसामुळे एकरी एक ते दोन पोते उत्पन्न झाले. एकरी १०-१५ हजार रुपये खर्च असताना उत्पन्न एक व दोन पोते झाल्याने खरीप हंगामात शेतकरी कर्जबाजारी झाला. यात त्याचे आर्थिक बजेट कोलमडले. सोयाबीन सवंगणीचा खर्च ६ हजार व उत्पादन चार हजाराचे, अशी बिकट स्थिती आहे. यामुळे शेतातील सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांनी जनावरांना खायला दिल्याचे चित्र आहे.
४दसरा सणाच्या सुमारास सर्वत्र कापूस शेतकऱ्यांच्या घरी येतो; पण यंदा तो शेतातच आहे. आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात कपाशीला पावसाची गरज होती; पण पाऊस आला नाही. सध्या कपाशी व तूर ही पिके कशीबशी तग धरून आहे. कापूस विकून शेतकरी दसरा हा सण साजरा करतात; पण यंदा कापूसच घरी आला नसल्याने शेतकऱ्यांचा तो मार्गही बंद झाल्याचे दिसते. आता कुठे कपाशीची बोंडे फुटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वाढत्या उष्णतामानाचा कपाशीवर विपरित परिणाम होत आहे. रबी हंगामासाठी पेरणी खर्च कसा करावा, सोयाबीन गेले कपाशीचे पीक हाताशी नाही, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
नियोजन ढासळणार
४जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत १० टक्के पाऊस अधिक झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आलेल्या पावसाने जमिनीची धूप शांत झाली नसल्याने खरीपातील उभे पीक वाळत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने तयार केलेले रबीचे नियोजन ढासळण्याचे संकेत आहेत.
४जमिनीत मुरता पाऊस झाला नसला तरी जिल्ह्यातील जलसाठे पूर्णत: भरले आहेत. यामुळे येथील पाणी ओलिताकरिता मिळेल असा शेतकऱ्यांना अंदाज आहे. पेरणीकरिता जमीन सज्ज करण्याकरिता जलसाठ्यातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
वाढते उष्णतामान आणि वातावरण बदलाचा परिणाम शेत पिकांवर होत आहे. यामुळे पिके समाधानकारक दिसत असली तरी त्याचा उत्पादनावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
- प्रमोद खेडकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, आर्वी.