पांढऱ्या सोन्याची सीसीआयकडून कासवगतीने खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:00:07+5:30
आज पावेतो २,३५६ शेतकऱ्यांनी सीसीआयकडे नोंदणी केली आहे. सीसीआयमार्फत खरांगणा येथे १ हजार ५१४ क्विंटल तर रोहणा येथे ३ हजार ६८७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. एका शेतकऱ्याला ४० क्विंटल कापसाची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊन काळात मालवाहू गाड्या मिळत नसल्याने २०-२० क्विंटल कापूस शेतकऱ्यांना न्यावा लागत आहे.

पांढऱ्या सोन्याची सीसीआयकडून कासवगतीने खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : तालुक्यातील सीसीआयच्या केंद्रावर कासवगतीने सुरू असलेल्या कापूस खरेदीमुळे पावसाळा निघणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सीसीआयने रोहणा येथे कापूस खरेदी सुरू केली होती. आता रोहणा आणि खरांगणा येथील उपबाजार समितीच्या आवारात तीन-तीन दिवसांचे नियोजन असून दिवस, वार निश्चित नाही. या केंद्रावर दररोज ७०० ते ८०० क्विंटल कापसाची खरेदी केली जात असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विनोद कोटेवार यांनी दिली.
आज पावेतो २,३५६ शेतकऱ्यांनी सीसीआयकडे नोंदणी केली आहे. सीसीआयमार्फत खरांगणा येथे १ हजार ५१४ क्विंटल तर रोहणा येथे ३ हजार ६८७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. एका शेतकऱ्याला ४० क्विंटल कापसाची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मात्र लॉकडाऊन काळात मालवाहू गाड्या मिळत नसल्याने २०-२० क्विंटल कापूस शेतकऱ्यांना न्यावा लागत आहे. एका दिवशी केवळ वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचाच शेतमाल खरेदी केला जात असल्याने पावसाळ्यासोबतच हिवाळा उलटून जाईल काय, अशी स्थिती आहे.
खासगी व्यापाऱ्यांकडून लूट सुरूच
आर्वी येथे कापूस खरेदी करणारे २१ व्यापारी आहेत. तेरा जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आहेत. दररोज दोन ते अडीच हजार क्विंटल कापसाची खासगी खरेदी होत आहे. सीसीआयचा खरेदीचा ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपये भाव असून खासगी व्यापारी ४ हजार ५ रुपये भाव देत आहे.
आर्वी बाजार समितीचा उपक्रम
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता बाहेर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा माल घेऊन येणाºया गाड्यांचे सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ निर्जंतुकीकरण करून गाडी समितीत सोडण्यात येत आहे. या उपक्रमाचे शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी कौतुक केले आहे.
जिनिंगमालक, सभापतींनी पालकमंत्र्यांना घातले साकडे
आर्वी येथे सीसीआयचे केंसद्र सुरू झाल्यास एका दिवशी जवळपास १०० ते ११० शेतकºयांच्या कापसाची खरेदी होईल. शहरातील कापूस खरेदी करणारे मोठे व्यापारी सीसीआय केंद्र घेण्यास इच्छुक आहे. कापसाचे केंद्र आर्वीत देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भैय्यासाहेब काळे, सचिव विनोद कोटेवार आणि काही जिनिंग-प्रेसिंग संचालकांनी वर्धा येथे पालकमंत्र्यांची भेट घेत शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता सीसीआयचे केंद्र देण्याची मागणी केली आहे.