पुलगाव पालिकेत काँग्रेसला मोठा हादरा

By Admin | Updated: August 26, 2015 02:06 IST2015-08-26T02:06:19+5:302015-08-26T02:06:19+5:30

पुलगाव नगरपरिषदेत नगराध्यक्षासह काँग्रेस पाच, भाजप सहा आणि शिवसेना एक अशा एकूण १२ नगरसेवकांनी...

Pulgaon municipal corporation suffers major havoc | पुलगाव पालिकेत काँग्रेसला मोठा हादरा

पुलगाव पालिकेत काँग्रेसला मोठा हादरा

घरचा अहेर : नगराध्यक्षासह काँग्रेस पाच, भाजप सहा व सेनेच्या १२ नगरसेवकांची आघाडी
वर्धा : पुलगाव नगरपरिषदेत नगराध्यक्षासह काँग्रेस पाच, भाजप सहा आणि शिवसेना एक अशा एकूण १२ नगरसेवकांनी एकत्र येऊन पुलगाव शहर विकास आघाडी स्थापन केल्यामुळे राजकीय भूंकपच झाला आहे. याचा हादरा थेट काँग्रेसला बसला आहे.
काँग्रेसचे नगराध्यक्ष मनीषकुमार साहु यांच्यासह नगरसेवक राजीव बतरा, स्मिता चव्हाण, सुनील ब्राम्हणकर, अर्चना राऊत व भाजप नगरसेवक विमल चंदेल, रंजना कडू, कल्पना परतेकी, सोनाली गायधने, राजकुमार गुजर व संजय गाते, तर शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री बरडे यांचा आघाडीमध्ये समावेश आहे.
सुमारे तीन महिन्यांपासून पुलगाव पालिकेचे नगराध्यक्ष मनीष साहू यांच्यावर काँग्रेस गटनेत्यासह काही नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाच्या आदेशाला धुडकावत अविश्वास आणण्यासाठी हालचाली चालविल्या होत्या. त्यामुळे पालिकेच्या विकास कामात व पुलगाव शहराच्या विकासाच्या कामाला खीळ बसली होती, असा आरोप सदर बाराही नगरसेवकांनी केला आहे.
ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसचे चार, भाजपाचे पाच, शिवसेनेच्या एक व दोन स्वीकृत सदस्यांनी अध्यक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने मंगळवारी पालिकेत उपरोक्त सर्व नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस, भाजप व शिवसेना पुरस्कृत पुलगाव शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. यानंतर या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. या पुढे नगराध्यक्ष हे या आघाडीचेच असल्याचे संबोधले जाईल व आघाडीच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणार असल्याची घोषणा एका जाहीर पत्रकाद्वारे केली आहे. पुलगाव नगर पालिकेत एकूण १९ नगरसेवक असून दोन स्वीकृत सदस्य आहे. यामध्ये काँग्रेस-१०, भाजप-५, सेना-१, अपक्ष-३ असे पक्षीय बलाबल आहे. उपरोक्त आघाडीत नगराध्यक्षासह काँग्रेसचे पाच सदस्य सहभागी झाल्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, देवळी-पुलगाव मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व असताना पुलगाव पालिकेतील या घडामोडींमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
यापुढे नगराध्यक्षही आघाडीचाच संबोधणार
या १२ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आघाडी स्थापन केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यापुढे नगराध्यक्ष हे या आघाडीचेच असल्याचे संबोधल्या जाईल व आघाडीच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणार असल्याची घोषणा एका जाहीर पत्रकाद्वारे केली आहे.

Web Title: Pulgaon municipal corporation suffers major havoc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.